Mon, Jun 24, 2019 17:19होमपेज › Nashik › सोशल मीडियावर तिळाचा गोडवा

सोशल मीडियावर तिळाचा गोडवा

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:37PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

नववर्षातील पहिल्या मराठमोळ्या मकरसंक्रांतीच्या सणाची शहरात धूम पाहायला मिळाली. तरुणाईचा हक्काचा चाट कट्टा असलेल्या सोशल मीडियावरही ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ संदेशाचा दिवसभर वर्षाव सुरू होता. शुभेच्छा संदेशांबरोबरच धम्माल विनोदापासून ते नायलॉन मांजाचा वापर टाळा, असे जनजागृती करणारे संदेश शेअर केले जात होते. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरवर  गोडगोड संदेश आणि ‘गयी बोलाऽऽ रे धिना’चा आवाज घुमला.

संक्रांतीचा सण म्हणजे पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद, पुरणपोळीवर ताव व सायंकाळी एकमेकांना तिळगूळ देऊन तोंड गोड करणे हे ओघाने आलेच. पण, हल्ली पारंपरिक सणांची सोशल मीडियावरही धम्माल पाहायला मिळत आहे. एक दिवस अगोदरच ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा संदेशांनी फेसबुक पेज, व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर गर्दी केली होती. मित्र-मैत्रिणी एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत होते. काही ग्रुपवर सकाळपासून मित्र-मैत्रिणी एकमेकांना टक्के टोणपे देत होते. संक्रांतीचा सण म्हणजे आपसातील मतभेद, मनभेद, भांडणांना तिलांजली देऊन तिळगूळ देऊन तोंड गोड करणे होय. हाच धागा पकडून सोशल मीडियावर रुसवे फुगवे सोडून शुभेच्छा संदेश पाठवले जात होते.

संक्रांतीचा अर्थ, आजच्या दिवसाचे धार्मिक व वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व, तिळगूळ वाटपाचा खरा उद्देश, तिळगूळ खाण्याचे महत्त्व आदी माहिती विविध गु्रपवर दिली जात होती. संक्रांत म्हणजे पतंगींचा उत्सव. ज्या प्रमाणे पतंग आकाशात उंच उडते त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या यशाची पतंग अशीच उंच उडावी, अशा प्रेरक व गंमतीदार संदेशांनी गर्दी केली होती. नोकरी व्यवसायानिमित्त परिवारातील अनेक सदस्य विखुरले गेले आहेत. मात्र, सोशल मीडियाद्वारे गोड गोड शुभेच्छा देऊन अनेकांनी संक्रांतीचा आनंद द्विगुणित केला. तिळगूळ, आकाशात उंच उडणारी पतंग अशा इमेज, व्हिडिओ आदींचा शुभेच्छा देण्यासाठी वापर केला जात होता. मकारसंक्रांतीमुळे अवघा सोशल मीडिया गोड झाला होता.

‘नायलॉन’बाबत जनजागृती

पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर पक्ष्यांच्या जिवावर बेततो. त्यामुळे नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील काही उत्साही पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करतात. सोशल मीडियावर पर्यावरणप्रेमींकडून नायलॉन मांजाचा वापर टाळा, अशी जगजागृती केली जात होती. एक दिवसाची हौस पक्ष्यांच्या जिवावर बेतते, त्यामुळे नायलॉनचा वापर टाळा, असे संदेश शेअर केले जात होते.