होमपेज › Nashik › बॉश, इप्कॉस आणि इतर कंपन्या उचलणार खर्च

धावपटूंना मिळाले आर्थिक पाठबळ

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:20AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

जपान येथे 2020 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये देशाचे अधिकाधिक खेळाडूंनी प्रतिनिधित्व करावे, यासाठी क्रीडा क्षेत्रात विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नांना आता नाशिकमधील कंपन्यांची साथ लाभणार आहे. नाशिकचे धावपटू पूनम सोनूने, किसन तडवी, आणि अभिजित हिरकुड या तिघांना बॉश, इप्कॉस तसेच इतर कंपन्यांनी पुढील 3 वर्षांचे प्रायोजकत्व देणार आहे. 

महिंद्रा, बॉश कंपनीने सर्वप्रथम धावपटूंना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले होते. आगामी ऑलिम्पिकपूर्वी नाशिकमधून जास्तीत जास्त टॅलेन्ट तयार व्हावे, यासाठी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक रनच्या माध्यमातून या तिघा धावपटूंना पुढील तीन वर्षासाठी 1 कोटी 11 लाखांचे प्रायोजकत्व देण्याची तयारी कंपन्यांनी दाखवली आहे. त्यात बॉश आणि इप्कॉस या दोन कंपन्या तीन वर्षात 60 लाखांचे तर अन्य सर्व कंपन्या तसेच निधी संकलनातून 50 लाख रुपयांचा निधी जमा करुन देणार आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. 8) नाशिक रन तसेच कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेत त्यांच्यापुढे हा प्राथमिक प्रस्ताव सादर केला. त्याचवेळी तिघाही खेळाडूंना प्राथमिक मदत म्हणून प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. या तिन्ही धावपटूंना पुढील तीन वर्षांसाठी हा निधी मिळणार आहे. त्यात या खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी 30 लाख रुपये, अकॅडमी अंतर्गत प्रशिक्षणासाठी 50 लाख रुपये, तिन्ही वर्षातील खेळाडूंच्या संपूर्ण तयारीसह फिजिओेथिरपीसह अन्य खर्चासाठी 27 लाख रुपये तर या खेळाडूंच्या प्रवास भाड्यासाठी 4 लाख रुपये असे 1 कोटी 11 लाख रुपये देण्यात येणार आहेत. 

धनादेश वितरणाप्रसंगी  इप्कॉसचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, नाशिक रनचे विश्वस्त प्रबल रे, संदीप पांडे, खजिनदार आर. ए. कासार, चौधरी ट्रॅव्हल्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी आणि प्रशिक्षक विजेंद्रसिंह आदी उपस्थित होते.