Tue, Jul 23, 2019 07:02होमपेज › Nashik › विशेष मुलांच्या अभिनयाला दिलखुलास दाद

विशेष मुलांच्या अभिनयाला दिलखुलास दाद

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:34PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

विशेष मुलांनी ‘शब्देविण संवाद’ साधत आपल्या अभिनयातून उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. जगण्याची शिकवण देणारी बालनाट्ये गुरुवारी (दि. 11) स्पर्धेत सादर झाली. 

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित पंधराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत गुरुवारी पाच नाटके सादर झाली. महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालयातर्फे सादर झालेल्या ‘वन वे’ नाटकाने आयुष्यात कितीही संघर्ष आला, तरी कुणावर अवलंबून न राहता वाटचाल करण्याचा संदेश दिला. अनाथ मुलाचा भिकार्‍याशी निर्माण झालेला ऋणानुबंध, त्यातून त्याने शोधलेली व्यवसायाची वाट, नंतर भिकार्‍याचाही अपघाती मृत्यू झाल्यानंतरही मुलाने चोखाळलेली शिक्षणाची वाट असे या नाटकाचे कथानक होते. कर्णबधिर मुलांनी सादर केलेल्या या नाटकात एकही संवाद नव्हता. लेखन व दिग्दर्शन धनंजय वाबळे यांचे होते. अनिकेत देशमुख, रोहन सोनवणे, ऋतुजा डोखळे आदींसह वीस मुलांनी त्यात भूमिका केल्या. प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, नेपथ्य नीता घरत, वेशभूषा मीनाक्षी बागल, तर संगीत रोहित सरोदे यांचे होते. 

कृपा शैक्षणिक, सामाजिक संस्थतर्फे ‘लेट्स बिगीन’ नाटक सादर झाले. नात्यांची वीण घट्ट करण्याचा, संयुक्‍त कुटुंबपद्धतीचा संदेश देणार्‍या या नाटकाचे लेखन प्रियंका पाटील यांचे, तर दिग्दर्शन पूनम पाटील यांचे होते. दूर्वाक्षी पाटील, प्रथमेश जाधव, नकुल चौधरी आदींसह तेरा मुलांनी त्यात भूमिका केल्या. प्रकाशयोजना चेतन ढवळे, संगीत रामेश्वर धापसे, नेपथ्य सुयोग देशपांडे यांचे होते. 

लोकहितवादी मंडळातर्फे ‘दशावतार’ हे देवेन कापडणीस लिखित व अपूर्वा शौचे-देशपांडे दिग्दर्शित नाटक सादर झाले. इगतपुरी येथील इंदिराभारती कर्णबधिर निवासी विद्यालयातर्फे ‘झीरो बन गया हीरो’ हे नाटक सादर करण्यात आले. दिग्दर्शन भारती साळुंके यांचे, तर लेखन शुभदा संसारे यांचे होते. प्रकाशयोजना सिद्धार्थ भोईर, नेपथ्य गणेश घोडेकर, संपत कडाळी, रामा पोकळा, मानसी सानप, ऋतिक खान, पप्पू झुगरे, शंकर हंबीर आदींनी भूमिका केल्या. ग्लोबल व्हिजन इंग्लिश स्कूलने ‘पाण्यापायी पडला घाव’ हे नाटक सादर केले.

आत्महत्येचा विचार घोळत असलेला शेतकरी व त्या भीतीच्या सावटाखाली जगणारी मुलगी यांच्या भावभावनांचे दर्शन त्यातून घडविले. नाटकाचे लेखन विजय कुमावत यांचे, तर दिग्दर्शन रोहित पगारे यांचे होते. प्रकाशयोजना कृतार्थ कन्सारा, पार्श्वसंगीत अमन ठोंबे, नेपथ्य जयश्री पांडे यांचे होते. ओम आडके, श्रुती पवार, वृंदा घोलप, हर्षवर्धन पवार आदींनी भूमिका केल्या.