Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Nashik › सटाण्यात मनसे कार्यकर्त्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

सटाण्यात मनसे कार्यकर्त्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:32PMसटाणा : वार्ताहर

तालुक्यासाठी कायमस्वरूपी तहसीलदार मिळण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बुधवारी (दि.4) तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला.आत्मदहनाचा इशारा दिलेला असल्याने पोलिसांची करडी नजर होती. मात्र, मनसेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालय गाठून अंगावर डिझेल टाकून पेटवून घेतले. मात्र, पोलिसांनी तत्काळ आग विझवून आंदोलकांना ताब्यात घेतले. सटाणा तहसीलदारपदी दोन वर्षात तब्बल दहावेळा खांदेपालट करण्यात आला. जून 2016 पासून तहसीलदारपद तात्पुरते किंवा प्रभारी असून, यामुळे तालुक्यात प्रशासकीय कामकाजाची घडी विस्कटली आहे. कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्‍तीसाठी मनसेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. याबाबत यापूर्वी तहसीलदार कार्यालय गेट बंद आंदोलन करूनही कार्यवाही झाली नाही. मनसेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष पंकज सोनवणे, मनविसे शहराध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे, सरचिटणीस मंगेश भामरे आदी तहसीलदार कार्यालयासमोर  आत्मदहन करण्याच्या बेतात होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. प्रमुख पदाधिकार्‍यांवर बुधवारी (दि.4) सकाळपासून पाळत ठेवण्यात आली होती.