होमपेज › Nashik › महाराष्ट्र-गुजरात सीमा भूकंपाने हादरली

महाराष्ट्र-गुजरात सीमा भूकंपाने हादरली

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 12:03AMनंदुरबार : वृत्तसंस्था

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर शनिवारी सायंकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातही भूकंपाचे हलके धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुजरात हद्दीत 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून, नंदुरबार जिल्हा हद्दीत सौम्य धक्के जाणवले असण्याची शक्यता आहे. नाशिक येथील मेरी संस्थेने नवापूर हद्दीत भूकंपाची नोंद झाली नसल्याचे कळवले आहे. तर नवापूर हद्दीत कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, भूकंपामुळे नवापूर नगरपालिका हद्दीतील काळंबा भागात अविनाश बिर्‍हाडे यांच्या घरातील भांडी पडली.

तसेच त्यांच्या घराची भिंत, तसेच टाइल्सला तडे गेले आहेत. तर गुजरातमधील तापी जिल्ह्यातील उच्छल, वालोड परिसरातही भूकंपाचे झटके जाणवल्याचे माहिती मिळाली आहे. भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती भरूच भूकंपमापन केंद्राने दिली आहे. प्रशासनाने जनतेला घाबरून जाऊ नये असे, आवाहन केले आहे.