Wed, May 22, 2019 20:17होमपेज › Nashik › पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 11:24PM

बुकमार्क करा
त्र्यंबकेश्‍वर : ज्ञानेश्‍वर महाले

त्र्यंबकेश्‍वर हे साक्षात कैलास असल्याची अनेक साधू-महंत व वारकर्‍यांची भावना असून, संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथांनी समाधी घेतल्याने पावन झालेल्या समाधी मंदिराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. वारकर्‍यांना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा देण्यासाठी सरकारकडून निधी कमी पडू न देता मंदिराला प्रशासकीय अधिकारी नेमणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. निवृत्तिनाथांच्या शासकीय महापूजेनंतर ते बोलत होते.

पौषवारीनिमित्त पहाटे पाच वाजता संत निवृत्तिनाथ समाधीची शासकीय महापूजा पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते सपत्नीक झाली. यावेळी आमदार निर्मला गावित, त्यांचे पती कार्यकारी अभियंता रमेश गावित उपस्थित होते.

पालकमंत्री महाजन म्हणाले की, यंदाची वारी निर्मलवारी करीत असल्याने यात्रेचे महत्त्व अधिक आहे. 20 हजारांहून अधिक कार्यकर्ते निर्मळ वारी पूर्ण करण्यासाठी काम करीत आहे. त्र्यंबकेश्‍वर हे निसर्ग व धार्मिक महात्म्यांचा संगम असून, येथे पर्यटनाच्या दृष्टीने विकासाच्या संधी असल्याने जागतिक पातळीवरील एक अध्यत्मिक, धार्मिक केंद्र करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सानप, श्रीकांत भारती, भाजपा शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, समाधी संस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे, सचिव पवनकुमार भुतडा, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेता समीर पाटणकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. शांताराम बागूल, मिलिंद तिवडे, संतोष भुजंग, हर्षल शिखरे, सुयोग वाडेकर, भावेश शिखरे, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार महेंद्र पवार, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, सभापती मनीषा पवार, शिवाजी गांगुर्डे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, विश्‍वस्त पवनकुमार भुतडा, त्र्यंबकराव गायकवाड, जयंत गोसावी, पुंडलिक थेटे, पंडित कोल्हे, रामभाऊ मुळाणे, डॉ. धनश्री हरदास, ललिता शिंदे, योगेश गोसावी, जिजाबाई लांडे, अविनाश गोसावी, जयंत गोसावी आदी विश्‍वस्तांसह वारकरी सांप्रदायाचे जिल्हाध्यक्ष नितीन सातपुते उपस्थित होते.

संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी प्रास्ताविक करून संस्थानतर्फे करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. भव्य समाधी मंदिर उभारण्यासाठी शासनाकडून तीर्थक्षेत्राप्रमाणे निधी आणण्यासाठी संस्थानच्या पाठीशी उभे राहून वारकर्‍यांच्या आद्यपीठाचा विकास करावा, अशी मागणी केली. यावेळी समाधी संस्थान व नगरपालिकेतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.