Sun, May 26, 2019 17:09होमपेज › Nashik › रंगकर्मींत फूट पाडण्याचा प्रयत्न

रंगकर्मींत फूट पाडण्याचा प्रयत्न

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:49PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिका प्रशासन व्यावसायिक व हौशी रंगकर्मींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून, तो कदापि यशस्वी होऊ दिला जाणार नसल्याचा इशारा रंगकर्मींनी दिला. महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीविरोधात आयुक्‍तांना येत्या दोन दिवसांत निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीमुळे शहरातील रंगकर्मींमध्ये रोष असून, यासंदर्भातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (दि. 5) कलावंतांची बैठक झाली. कालिदास कलामंदिराच्या आवारात झालेल्या या बैठकीत सर्वांनी भाडेवाढीविरोधात तीव्र नाराजी व्यक्‍त करीत संघटित होऊन लढा देण्याचा निर्धार केला. मनपा काँग्रेस गटनेते तथा नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष शाहू खैरे यांनी सांगितले की, ‘कालिदास’मध्ये अद्याप कर्मचारीही नेमले नसताना, नाट्यगृहाचा खर्च वाढल्याचा दावा करणे अजब आहे. स्मार्ट सिटीच्या आठ संचालकांमध्ये आपला समावेश असून, सर्वांच्या परवानगीशिवाय कोणा एकाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. बाहेरून आलेल्या व्यक्‍तीला शहरातील परंपरा, संस्कृती माहीत नाही. त्यामुळे या प्रकरणी सत्ताधार्‍यांना जाब विचारण्याची गरज आहे. मात्र, दुदैवाने ते गप्प आहेत. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी सांगितले की, या आंदोलनात पक्षीय राजकारण आणले जाणार नाही. आम्हा सर्वांचा रंगकर्मी हाच धर्म असून, एकत्र येऊन लढलो तरच न्याय मिळू शकेल. 

दरम्यान, मूळ कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात कालिदास नावाचा इतिहास, त्याचा मंदिर म्हणून असलेला उल्लेख, तत्कालीन ठराव आदी बाबी नमूद आहेत. आयुक्‍तांना निवेदनाबरोबर त्या स्मरणिकेची प्रत भेट देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीला ज्येष्ठ नाट्यलेखक विवेक गरुड, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, सदानंद जोशी, सुनील ढगे, प्रकाश साळवे, सुनील देशपांडे, नंदन दीक्षित, प्रवीण कांबळे, अभय ओझरकर, मोहन उपासनी, राजेश शर्मा, पल्लवी पटवर्धन, पंकज क्षेमकल्याणी आदी उपस्थित होते.