Wed, Nov 14, 2018 03:56



होमपेज › Nashik › गावीतांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांना अटक  

गावीतांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांना अटक 

Published On: Aug 06 2018 7:50PM | Last Updated: Aug 06 2018 7:52PM



धुळे : प्रतिनिधी

धुळयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खासदार हिना गावीत यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी तीन जणांना आज शहर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हा हल्ला पुर्वनियोजित कट असून या प्रकरणी पोलिस अधिक्षक यांची तातडीने बदली करण्याची मागणी आज हिना गावीत यांनी केली. यानंतर सायंकाळी धुळयाच्या पोलिस अधिक्षक पदावर विश्वास पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

धुळयात जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या खासदार हिना गावीत यांच्या गाडीची मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी तोडफोड केली होती. या घटनेनंतर रात्री उशीरा आंदोलक अमोल मराठे सह २० ते २५ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवी कलम ३०७, १०३, १४७, १४९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात सकाळपासुन अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे आणि पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी आंदोलनाच्या समन्वयकांबरोबर चर्चा सुरू केली. तोडफोड करणार्‍या कार्यकत्यांचे फोटो व्हायरल झाल्याने या आधारावर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून यादी तयार करण्याचे काम सुरू केले. यात गाडीच्या छतावर चढून घोषणाबाजी करणारे अमोल भागवत, दिनेश आटोळे, अमोल चव्हाण यांना क्रांती मोर्चाच्या अधिकार्‍यांनी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली.  

याच प्रश्नावरून आज लोकसभेत हिना गावीत यांनी या घटनेबाबत माहिती देतांना आपली प्रतिक्रीया दिली. यात त्यांनी आंदोलकांना गाडीत महिला असल्याची माहिती दिली होती. माझ्या गाडीच्या आधी काही लोकप्रतिनिधींच्या गाडया होत्या. मात्र त्या गाडयांसमोर कोणतेही आंदोलन  करण्यात आले नाही. पण माझी गाडी पाहून त्यांनी हल्ला चढवला. यावेळी घटनास्थळी मोजकेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी देखिल आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातच मोठा पोलिस अधिकारी देखील नसल्याने हा प्रकार वाढला असे त्या म्हणाल्या. याप्रकरणात पोलिस अधिक्षक यांची तातडीने बदली करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यानुसार सायंकाळी धुळयाच्या पोलिस अधिक्षक पदावर विश्वास पांढरे यांची बदली करण्यात आली. यापुर्वीच्या आदेशात पोलिस अधिक्षक रामकुमार यांची राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक पदावर बदली झाली आहे. मात्र कौटुंबिक अडचणीचे कारणे देत त्यांची या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी यापुर्वी केल्याचे सांगितले जाते आहे. त्याच आदेशात धुळयाच्या पोलिस अधिक्षक पदावर प्रविण मुंडे यांची बदली झाल्याचे नमुद करण्यात आले होते. मात्र ते देखील रूजू न झाल्याने आता पुन्हा नविन अधिकार्‍याच्या बदलीचे पत्र आले आहे. या नवीन पत्रातील आदेशाला वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखिल दुजोरा दिला आहे.