Tue, Apr 23, 2019 14:14होमपेज › Nashik › ‘आयएमए’चा संप; रुग्णांचे हाल

‘आयएमए’चा संप; रुग्णांचे हाल

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 28 2018 10:54PMनाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेने (आयएमए) शनिवारी (दि. 28) संप पुकारला. यावेळी शिष्टमंडळाने विधेयकाविरोधात खासदार हेमंत गोडसे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. दरम्यान, सायंकाळी 6 वाजेनंतर रुग्णालयांच्या सेवा नियमित झाल्या. मात्र, या सर्व संपात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल झाले. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि.30) राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकातील जाचक तरतुदींना आयएमएचा विरोध आहे. या विधेयकातील अटींमुळे सर्वसामान्य रुग्णांंना दर्जेदार उपचार मिळणे कठीण होणार आहे. विधेयक पास झाल्यास वैद्यकीय शिक्षणाचा खर्च वाढणार असून, 50 टक्के जागा सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवक्याबाहेर जाणार आहेत. त्यामुळे विधेयकात जाचक अटी वगळतानाच काही दुरुस्त्या आयएमएने सुचविल्या होत्या. मात्र, या दुरुस्त्यांसह हे विधेयक संसदेत सादर होणार नसल्यानेच आयएमएने देशभरात शनिवारी संप पुकारला होता. या संपात देशभरातील सुमारे 11 लाख डॉक्टर्स सहभागी झाले होते. 

जिल्ह्यातही सकाळी 6 ते सायंकाळी 6 यावेळेत संप करण्यात आला. या संपात जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक डॉक्टर्स सहभागी झाले. दरम्यान, जिल्ह्यात संप यशस्वी झाल्याचा दावा आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी केला असला तरी संपाचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम झाला. बहुतांशी रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना संपाबाबतची कल्पना नव्हती. त्यामुळे रुग्णालयात आल्यावर त्यांना संप असल्याचे सांगण्यात येत होेते. ओपीडीही बंद असल्याने साध्या तपासण्यादेखील रुग्णांना करता आल्या नाहीत. परिणामी रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना उपचाराविनाच माघारी फिरावे लागले.