Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Nashik › खासदार गावित यांच्या वाहनाची तोडफोड

खासदार गावित यांच्या वाहनाची तोडफोड

Published On: Aug 06 2018 1:53AM | Last Updated: Aug 06 2018 12:01AMधुळे : प्रतिनिधी

धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातून नियोजन समितीच्या बैठकीतून बाहेर जाताना भाजपच्या खासदार हिना गावित यांच्या गाडीसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यार्ंनी निदर्शने केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी थेट गाडीवर चढून गाडीची तोडफोड केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत काही पोलिस जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी 10 ते 15 आंदोलकांना ताब्यात घेतले, तर सायंकाळी उशिरा या आंदोलकांना सोडण्यात आले.

16 दिवसांपासून आंदोलन सुरू असताना जिल्हा प्रशासनासह या लोकप्रतिनिधींनी साधी दखल घेऊन चर्चादेखील केली नसल्याने आंदोलकांमध्ये संतप्त भावना होती. त्यातच पालकमंत्री आणि रोहयो मंत्री यांचा ताफा बैठकीसाठी आला असता, आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर आमदारांच्या गाड्यांसमोरदेखील आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.  दुपारी दोन वाजता बैठक आटोपल्यानंतर मराठा आंदोलकांनी प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. तर पोलिसांनी हे प्रवेशद्वार उघडण्यासाठी जोर लावण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य बळाचा वापर करण्यास सुरुवात केल्याने आंदोलक बिथरले. आवारातून खासदार हिना गावित यांची गाडी  बाहेर येण्याच्या तयारीत असताना त्यांच्या गाडीवर काही आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचेवर पायाने मारण्यास सुरुवात केली.

तुमची बहीण असती तर...

गावित यांनी गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली. आंदोलकांना गाडीत आपण असल्याची माहिती होती तरीही त्यांनी गाडीवर चढून धिंगाणा घातला. अशा स्थितीत गाडीत तुमची बहीण असती तर तुमची काय भूमिका राहिली असती, असा प्रतिप्रश्‍न करून आपली नाराजी व्यक्‍त केली.