Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Nashik › मनसेत शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

मनसेत शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 11:18PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घसरलेले इंजीन पुन्हा ट्रॅकवर आणण्याचे काम पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हाती घेतले आहे. कधीकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीत आगामी काळात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. सर्वाधिक लक्ष शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लागून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या शर्यतीत माजी नगरसेवक अनिल मटाले यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

राज्यभरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचा सर्व ठिकाणी दारूण पराभव झाला. पराभवाचे शल्य मनात ठेवून राज ठाकरे यांनी नव्याने पक्ष बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन शिलेदारांच्या हाती पक्षाची धुरा दिली जात आहे. ज्या नाशिकमध्ये मनसेने सत्तेचा सोपान गाठला त्याच ठिकाणी पक्षाची वाताहात झाली. निवडणुकीत अवघे सहा नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्येही पक्षाची कार्यकारिणी नव्याने गठन करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पक्षात फेरबदलाची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या नाशिक दौर्‍यात त्याचे सूतोवाच मिळाले होते. सद्यस्थितीत मनसे शहराध्यक्षपदाची धुरा अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडे आहे.पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत देखील त्यांचा समावेश आहे. ते बघता नाशिकमध्ये नव्या चेहर्‍याला पक्षाच्या शहराध्यक्षपदी संधी दिली जाईल, असे बोलले जात आहे. या शर्यतीत माजी आ. नितीन भोसले यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, मागील काही दिवसांपासून भोसले हे पक्षामध्ये सक्रिय नाहीत. त्यामुळे शर्यतीत त्यांचे नाव मागे पडले आहे. 

सिडकोतून शहराध्यक्ष पदाचा चेहरा दिला जाईल, अशी चर्चा आहे. ते बघता माजी नगरसेवक अनिल मटाले यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तसेच, नवीन कार्यकारिणीत पक्षातील निष्ठावंतांना प्राधान्य देऊन मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. कार्यकारिणीत फेरबदल करून मनसे विधानसभेची तयारी करत असल्याचे समजते.