होमपेज › Nashik › आमदार, पोलिसाच्या वाहनाला टोइंगचा हिसका

आमदार, पोलिसाच्या वाहनाला टोइंगचा हिसका

Published On: Feb 10 2018 1:54AM | Last Updated: Feb 10 2018 1:49AMनाशिक : प्रतिनिधी

टोइंग कारवाईचा फटका आजपर्यंत सर्वसामान्य वाहनचालकांना बसला आहे. शुक्रवारी (दि.9) मात्र, वाहतूक पोलिसांनी एक विद्यमान आमदार व दोन पोलीस अधिकार्‍यांच्या गाडीवर टोइंगची कारवाई करून त्यांच्याकडून दंडाची पावती फाडली. कायद्यासमोर सर्व समान असा संदेश वाहतूक पोलिसांनी कारवाईतून दिला. मात्र, आमदार व पोलीस अधिकार्‍यांचे नाव सांगण्यात टाळाटाळ केली.

अंबिका एजन्सीला टोइंगचा ठेका देण्यात आला आहे. टोइंगसाठी अत्याधुनिक हायड्रोलिक वाहने खरेदी करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी नव्या हायड्रोलिक वाहनांद्वारे शुक्रवारी टोइंग कारवाईला दणक्यात प्रारंभ केला आहे. दिवसभरात दीडशेहून अधिक वाहनांवर कारवाईचा बडगा उगारून दंड वसूल केला. एरवी टोइंग कारवाई व वाहनचालक यांच्यातील वाद हे नेहमीचे समीकरण झाले होते. शुक्रवारी महापालिकेची मुख्य इमारत असलेल्या राजीव गांधी भवन येथून नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या आमदाराच्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी टोइंग कारवाई करताना हात आखडता घेतला नाही. आमदाराच्या गाडीमध्ये त्यांचा पीए होता. यावेळी त्याने कारवाईस विरोध केल्याचे समजते. 

टोइंग व्हॅनला सीसीटीव्ही असल्याने पोलिसांनी दबाव झुगारून आमदाराचे वाहन टोइंग करून नेले. रीतसर आर्थिक दंडाची पावती फाडल्यानंतर आमदाराचे वाहन सोडण्यात आले. लोकप्रतिनिधीच नव्हे तर ‘खाकी’लाही टोइंगचा दणका बसला. दोन पोलीस अधिकार्‍यांच्या गाड्या टोइंग करून नेण्यात आल्यात. त्यांच्याकडूनही दंडाची पावती फाडण्यात आली. एमजी रोड, ठक्कर्स बझार, कॉलेजरोड आदींसह शहरातील विविध परिसरात नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना टोइंगच्या कारवाईला सामोरे जावे लागले.