Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › आमदार निधीतून जिल्ह्यात 432 विकासकामे 

आमदार निधीतून जिल्ह्यात 432 विकासकामे 

Published On: Mar 14 2018 12:51AM | Last Updated: Mar 13 2018 11:42PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 15 आमदारांच्या आमदार निधीतून यंदा 432 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, प्रस्तावित कामांमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागातील विकासकामांची संख्या अधिक आहे. दरम्यान, या सर्व कामांसाठी 24 कोटी 5 लाख 88 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. सिन्‍नर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 60 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

मार्च एन्डजवळ आल्याने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये निधी पदरात पाडून घेण्यासाठी तसेच, तो खर्च करण्यासाठी लगबग सुरू आहे. यंत्रणांची एकीकडे धावपळ सुरू असतानाच जिल्ह्यातील आमदारांनी देखील त्यांंना उपलब्ध निधीतून विविध कामे प्रस्तावित केली आहे. यंदा पंधराही आमदार मिळून एकूण 28 कोटी 25 लाख 16 हजारांची मर्यादा देण्यात आली आहे. त्यापैकी आत्तापर्यत आमदारांकडून 432 कामे प्रस्ताव नियोजन विभागाकडे प्राप्त झाली आहेत. संबंधित कामांना प्रशासकीय मान्यता देत 24 कोटी 5 लाखांचा निधीला मंजूरी देण्यात आली आहे. 

शहरापेक्षा ग्रामीण भागातील आमदारांनी सुचविलेल्या कामांची संख्या अधिक आहे. सिन्नरमध्ये 2 कोटी 13 लाख 57 हजारांची साठ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याखालोखाल आदिवासी मतदारसंघ असलेल्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी 44 कामांसाठी 1 कोटी 63 लाख 12 हजारांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचवेळी कळवण मतदारसंघात फक्त 29 लाख 29 हजारांची चार कामे प्रस्तावित आहे. बागलाण या आदिवासी बहुल मतदारसंघातून आमदार दीपिका चव्हाण यांनी 2 कोटी 19 लाख 79 हजारांची 38 कामांची यादी प्रशासनाला सादर केली आहे. ग्रामीण भागात चक्‍क महिला आमदारांंकडून विकासकामांचा धडाका सुरू असताना नाशिक शहरातील पुरुष आमदार मात्र, निधी खर्च करण्यात पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. 

नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये 1 कोटी 41 लाख 46 हजारांच्या 25 कामांना मान्यता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे देवळाली मतदारसंघातील 32 कामांसाठी 1 कोटी 39 लाख 64 हजारांच्या निधीला प्रशासनाने मान्यता दिली आहे.