Thu, Jun 27, 2019 12:19होमपेज › Nashik › शिवसेना स्टाइलने टोलनाका बंद पाडणार : आ. घोलप

शिवसेना स्टाइलने टोलनाका बंद पाडणार : आ. घोलप

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 22 2018 11:00PMउपनगर : वार्ताहर

शिवसेनेच्या आंदोलनानंतर स्थानिकांना आठ दिवस टोलमाफी दिल्यानंतर आता पुन्हा कंपनी प्रशासनाने टोल आकारणी सुरू केली आहे. या संदर्भात 16 एप्रिलला मुंबई येथे आ. घोलप, खा. हेमंत गोडसे आणि कंपनी प्रशासनाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन स्थानिकांना टोलमाफी देण्याबाबत मागणी उचलून धरली. मात्र, यावर अजूनही तोडगा निघत नसल्याने आता टोल बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत या प्रकरणी शिवसेना स्टाइलने मार्ग काढला जाणार असल्याची माहिती आ. योगेश घोलप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर आठ दिवसांत व्यावसायिक वाहने वगळता कोणत्याही वाहनाकडून टोल घेणार नाही, असे तोंडी आश्‍वासन नाशिक-सिन्‍नर टोलवेज कंपनीचे अधिकारी सुनील भोसले यांनी दिले होते. मात्र, 19 एप्रिलपासून पुन्हा टोल वसुली सुरू करण्यात आल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे. शिवसेना कुठलीही पूर्वसूचना न देता टोलनाक्यावर पुन्हा आंदोलन करून टोलनाका बंद करणार असल्याची माहिती आ. घोलप यांनी दिली. शिंदे टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिघातील वर्तुळाकार परिसरात 244 रुपयांचा मासिक पास वाहनचालकांनी काढला पाहिजे. मात्र, स्थानिक 14 गावांना कंपनीने टोलमाफी दिली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे आ. घोलप म्हणाले. तसेच कंपनी प्रशासन आमच्या नावाचा वापर करून नागरिकांकडून टोल वसुली करीत आहे. कंपनीचे अधिकारी सुनील भोसले हे वाहनचालकांची दिशाभूल करून पाच हजार पास वाटल्याची खोटी माहिती देत असल्याचे घोलप म्हणाले.

नाशिक-पुणे रोडवरून परिसरातील हजारो शेतकर्‍यांना दिवसातून चार, सहा वेळा जावे लागते. शिंदे, पळसे, नाणेगाव, चेहेडी, चिंचोली, मोह, ब्राह्मणवाडे, वडगाव, जाखोरी, नायगाव, जायगाव, जामगाव, कोटमगाव या ठिकाणच्या नागरिकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. व्यावसायिक वाहने असल्याने त्यांना टोल भरावा लागतो. त्यामुळेच टोलविरोधात शिवसेना आंदोलन करणार आहे.

Tags : nashik, nashik news, MLA Yogesh Gholap, press conference,