Tue, Jul 23, 2019 01:55होमपेज › Nashik › आ. पंकज भुजबळ ‘मातोश्री’वर 

आ. पंकज भुजबळ ‘मातोश्री’वर 

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रवादीची मुलूख मैदान तोफ छगन भुजबळ हे तुरुंगातून जामिनावर  बाहेर आल्यावर शिवसेनेने मुखपत्रातून भुजबळांबद्दल सहानुभूती दाखवली. त्याचे पडसाद बुधवारी (दि.9) राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाले. भुजबळ यांच्या सांगण्यावरून त्यांचे पुत्र आ. पंकज भुजबळ यांनी ‘मातोश्री’ची पायरी चढत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना पेढ्यांचा पुडा देत भुजबळांचा संदेश पोहोचवला. बंद दरवाजाआड या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी मात्र, ही भेट दिवसभर चर्चेचा विषय ठरली.

भ्रष्टाचार व मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या भुजबळ यांना उच्च न्यायालयाने दोन वर्षांनंतर नुकताच जामीन दिला. सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्यांची सुटका झाली असली तरी उपचारांसाठी ते अद्याप रुग्णालयातच आहेत. विविध पक्षांचे नेते त्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेनेदेखील मुखपत्रातून या घटनेवर भाष्य केले. भुजबळ हे सेनेत असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. भुजबळांशी आमचे वैयक्तिक वैर नाही. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुखपत्रातून भुजबळांना क्‍लीन चिट दिली.

 शिवसेनेने भुजबळांबद्दल दाखवलेली सहानुभूती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. या घटनेचा दुसरा अंक बुधवारी पाहायला मिळाला. भुजबळ यांचे पुत्र आ. पंकज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा नेमका तपशील काय होता हे समजू शकले नाही. मात्र, छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरूनच पंकज यांनी ही भेट घेतल्याचे समजते. या भेटीत पंकज यांना वडिलांच्या तब्येतीची काळजी घे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याचेही वृत्त आहे.