Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Nashik › सर्व जाती-धर्मांसाठी चळवळ उभारावी

सर्व जाती-धर्मांसाठी चळवळ उभारावी

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 04 2018 11:31PMनाशिक : प्रतिनिधी

शहरात गंगापूर रोडलगत मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची जागा आरक्षित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. केवळ मराठाच नाही तर महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांसाठी मराठा तरुणांनी चळवळ उभी करावी, असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना केले. या चळवळीत लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय सहभाग नोंदविण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले. 

जिल्हा मराठा आंदोलन समितीचे अध्यक्ष सुनील बागूल यांच्या नेतृत्वाखाली विविध मराठा संघटनांच्या तरुणांनी मध्य नाशिकच्या आ. फरांदे यांच्या घरासमोर शनिवारी (दि. 4) थाळीनाद आंदोलन केेले. यावेळी आ. फरांदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. 

मराठा तरुणांच्या भावना रास्त असून, मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकार सकारात्मक असल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले. दोन वर्षांत मराठा समाजासाठी अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले. त्यात एक लाखाची क्रिमिलेयरची मर्यादा आधी सहा लाख आणि आता आठ लाखांवर आणली. 650 कोटींची तरतूद गेल्या आर्थिक वर्षात केली. चालू आर्थिक वर्षात 1200 कोटी रुपयांची तरतूद आहे. बिनव्याजी 10 लाख रुपये कर्ज योजनेत बँकांना भेडसावणारा व्याज परतावा हा मुद्दा सरकारने निकाली काढून हमी घेतल्याचे फरांदे यांनी स्पष्ट केले. 

आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, बिनव्याजी कर्ज, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या निर्णयांची  अंमलबजावणी योग्य प्रकारे करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी करण गायकर, राजू देसले, तुषार जगताप, गणेश कदम, तुषार गवळी, माधवी पाटील, पूजा धुमाळ,मनोरमा पाटील, चेतन शेलार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

.. तर किंमत मोजावी लागेल

मराठा क्रांती मोर्चाच्या ध्येय धोरणांशी प्रतारणा करणार्‍या गद्दारांचा समाचार घेण्यास सकल मराठा समाज सक्षम आहे. सरकारने खासदार नारायण राणेंसारख्या प्रवृत्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोर्चात फूट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा त्याची मोठी किंमत मोेजावी लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकार पातळीवर लोकप्रतिनिधींनी आपली क्षमता पणाला लावावी, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली.

पुरावे द्यावेत; बंदोबस्त करू 

दोन दिवसांपासून माजी खासदार नीलेश राणे आणि रूपाली पाटील यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राणे यांच्या बोलण्यातून काही मराठा बांधव क्रांती मोर्चाचे भांडवल करून सरकारसोबत डीलिंग करीत असल्याचा संदेश पसरविला जात आहे. कुणीही मराठा बांधव अशा पद्धतीने डीलिंग करीत असल्यास सरकारने तो पुरावा जाहीर करावा, त्यांचा बंदोबस्त करण्यास सकल मराठा समाज सक्षम आहे, असेही समाजातर्फे यावेळी सांगण्यात आले.