होमपेज › Nashik › आ. बच्चू कडू जिल्हा परिषदेला विचारणार जाब?

आ. बच्चू कडू जिल्हा परिषदेला विचारणार जाब?

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:08AMनाशिक : प्रतिनिधी

अपंग कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा मुद्दा, बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करणार्‍यांवर गुन्हे दाखल करणे, यासारख्या विविध प्रश्‍नांवर वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेला धारेवर धरणारे आमदार बच्चू कडू मंगळवारी (दि.24) नाशिकमध्ये दाखल होत असून, आश्‍वासनपूर्ती न झाल्याबद्दल जाब विचारतील काय, याकडे कर्मचार्‍यांसह नाशिककरांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे बनावट प्रमाणपत्रे सादर करणार्‍यांवर अद्याप ना गुन्हे दाखल झाले, ना जिल्हा परिषदेत लिफ्ट बसविली गेली.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या काळात आ. कडू यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली होती. अपंग परिचरांवर बदलीत अन्याय करताना थेट इतिवृत्तच बदलले गेले, ही बाब त्यावेळी चर्चेत आली होती. तेव्हा यात दोषी असणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन आ. कडू यांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या कर्मचार्‍याला पाठीशी घालून प्रकरण उघडे करणार्‍या परिचरांना थेट सुरगाणा तालुक्यातच बदलीने धाडण्यात आले. बनावट  अपंग प्रमाणपत्राच्या मुद्यावरही उभयंतांमध्ये चर्चा झाली होती. तेव्हा शारीरिक पडताळणी करून संबंधित कर्मचार्‍यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचेही आश्‍वासन आ. कडू यांना दिले होते. अपंगांसाठी जिल्हा परिषदेत लिफ्ट बसविण्यात येणार होती. अपंगांना घरकुल वाटपातही जास्त अपंग असलेल्यांना लाभ डावलण्यात आला. तर गेल्यावर्षीची अपंग शाळांची शिष्यवृत्तीही अद्याप प्रलंबित आहे.  

वर्षभरानंतर आ. कडू पुन्हा नाशिकमध्ये येत आहेत. पंचवटीतील जनता दरबारानंतर जिल्हा परिषदेतील बहुतांश अन्यायग्रस्त कर्मचारी त्यांना भेटून कैफियत मांडणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे खुद्द आ. कडू हेदेखील वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनांसंदर्भात प्रशासनाला जाब विचारण्याची शक्यता आहे. कारण, बनावट अपंग प्रमाणपत्र शोधून काढण्याचा देखावा सुरूवातीला करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र एकाही कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. दोन कर्मचार्‍यांचे प्रमाणपत्र बनावट आढळले पण, त्यांना पद्धतशीपणे पाठीशी घातले गेले. जे.जे.रुग्णालयात पडताळणीसाठी पाठविलेले एका कर्मचार्‍याचे प्रमाणपत्राचे नेमके काय झाले, याचे उत्तर सामान्य प्रशासन विभागाकडून आ. कडू घेणार का, याकडेही  लक्ष लागले आहे. दिव्यांगांसाठी लिफ्ट तर अजून बसविलेलीच नाही. या सर्व प्रश्‍नांबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आ. कडू यांना आश्‍वासने दिली होती. मात्र, आता मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणारे डॉ. नरेश गिते आणि आ. कडू आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आ. कडू यांच्या दौर्‍याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.