Tue, Jul 23, 2019 11:48होमपेज › Nashik › ‘एमडी’ ड्रग्जची प्रयोगशाळाच उद्ध्वस्त

‘एमडी’ ड्रग्जची प्रयोगशाळाच उद्ध्वस्त

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 26 2018 10:48PMनाशिक : प्रतिनिधी

एमडी ड्रग्जचा पुरवठा करणार्‍या पाच जणांना अटक केल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ड्रग्ज बनवणार्‍या उच्चशिक्षित वैज्ञानिकासह दोघांना अटक केली. तसेच ज्या ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवले जात होते ती प्रयोगशाळादेखील पोलिसांनी उद्ध्वस्त करीत सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. 

हरिश्‍चंद्र उर्वादत्त पंत (24, रा. बोईसर) आणि अरविंद कुमार (रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील अरविंद याने एमएस्सी (ऑरगॅनिक केमिस्ट्री)पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. तसेच तो दहा वर्षांपासून विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करत होता. पोलिसांनी 16 ते 26 मे या दहा दिवसांच्या कालावधीत कारवाई करून 25 किलो एमडी ड्रग्ज, 90 लाख रुपयांच्या दोन आलिशान कार आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल असा एकूण तीन कोटी 20 लाख 88 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. आत्तापर्यंत या कारवाईत पोलिसांनी एकूण सात संशयित पकडले आहेत. त्यातील नदीम यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, चौघांना सोमवार (दि.28)पर्यंत, तर अरविंद आणि हरिश्‍चंद्र यांना शुक्रवार (दि.1)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने 16 मे रोजी पाथर्डी फाटा येथे कारवाई करून रणजित गोविंदराव मोरे (32, रा. पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (31) आणि नितीन भास्कर माळोदे (32, दोघे रा. आडगाव शिवार) या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 265 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि टाटा सफारी असा 15 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून रणजित मोरे यास ड्रग्ज पुरवणार्‍या नदीम सलीम सौरठीया (30, रा. नागपाडा, मुंबई) आणि सफैउल्ला फारुख शेख (23, रा. मीरारोड, मुंबई) या दोघांना 2200 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 80 लाख रुपयांची जॅग्वार कार, असा एक कोटी 24 लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन एमडी ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकास दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या पथकाने सापळा रचला.

पोलिसांच्या दोन कारवाईनंतर अरविंद कुमार हा उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या माहितीनुसार हरिश्‍चंद्र पंत याच्या मदतीने बोईसर येथे एका फ्लॅटमध्ये छोटी प्रयोगशाळा उभारून एमडी ड्रग्ज बनवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी बोईसर येथे जाऊन प्रयोगशाळा उद्ध्वस्त करीत साडेचार किलो एमडी ड्रग्ज, एमडी बनवण्यासाठी लागणारी 18 किलो क्रूड पावडर, कच्चा माल, यंत्रसामग्री जप्‍त करीत संशयित पंत यास अटक केली आहे. 

पोलीस आयुक्‍त डॉ. सिंगल, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्‍त अशोक नखाते, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागूल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळक, वसंत पांडव, पोलीस नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, विशाल काठे, गणेज वडजे, नीलेश भोईर आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली. 

एमडी ड्रग्जचा प्रवास

एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी सात वेगवेगळे पदार्थ, केमिकल लागत होते. अर्धा किलो ड्रग्ज बनवण्यासाठी एक किलो कच्चा माल लागतो. तसेच ड्रग्ज बनवण्यासाठी किमान पाच ते सात दिवसांचा कालावधी लागत असतो. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यातून तयार होणारा थर थंड झाल्यानंतर एमडी ड्रग्ज तयार होत होता. त्यानंतर हे ड्रग्ज मागणीनुसार पुरवले जात होते.