Tue, Jul 23, 2019 06:58होमपेज › Nashik › जिल्ह्यातील धरणसाठा अर्ध्यावर!

जिल्ह्यातील धरणसाठा अर्ध्यावर!

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी

दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढायला सुरवात झाली असून, ग्रामीण भागाला टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमधील साठा अर्ध्यावर आला आहे. आजमितीस जिल्ह्यात 51 टक्के साठा असून, गंगापूर धरणात 4166 दलघफू (74 टक्के) पाणी आहे. त्यामुळे शहरवासीयांची चिंता थोडीफार दूर झाली आहे.

जिल्ह्यावर यंदा वरुणराजाने कृपावृष्टी केल्याने धरणांमध्ये चांगली आवक झाली होती. नोव्हेंबरमध्ये धरणांमधील साठा 85 टक्के इतका होता. मध्यंतरीच्या काळात प्रमुख धरणांमधून पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्यात आले. यामध्ये नाशिक जिल्ह्यासह नगर पाणी सोडण्यात आले. पंधरवड्यापूर्वीच नांदूरमध्यमेश्‍वर एक्स्प्रेस कॅनॉलमधून औरंगाबाद व मराठवाड्याला आवर्तन सुटले. दरम्यान, फेबु्रवारीच्या अखेरीस जिल्ह्यातील तापमानात मोठा बदल झाला आहे. कमाल तापमानाचा पारा 34 अंशापर्यंत पोहचला आहे. उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. एकीकडे उन्हे वाढत असताना धरणांमधील साठ्यात लक्षणीय घट होत चालली आहे. 

जिल्ह्यात आजमितीस एकूण 33 हजार 619 दलघफू एवढा साठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूहातील चार प्रकल्प मिळून एकूण 7 हजार 301 दलघफू म्हणजेच 71 टक्के साठा आहे. दारणासारख्या मोठ्या धरण समूहात केवळ 55 टक्के पाणी म्हणजेच 10 हजार 396 दलघफू इतके पाणी शिल्लक आहे. दरम्यान, पालखेड व गिरणा खोर्‍याची परिस्थिती वेगळी नाही. पालखेड समूहातील तीन प्रकल्पात 4894 (68 टक्के) तर गिरणा खोर्‍यातील आठ धरणांमध्ये 9033 दलघफू साठा आहे. 

यापुढील काळात उन्हाळा अधिक वाढत जाणार असून, ग्रामीण भागातून विशेषत: पाण्याची अधिक मागणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध साठ्याचे नियोजन आत्तापासूनच करणे गरजेचे झाले आहे. नागरिकांनीही पाणी बचतीकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे.