Wed, Jul 17, 2019 18:06होमपेज › Nashik › आरोग्य अभियान कर्मचार्‍यांचा लाँग मार्च

आरोग्य अभियान कर्मचार्‍यांचा लाँग मार्च

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 17 2018 11:25PMनाशिक : प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कंत्राटी अधिकारी-कर्मचार्‍यांना शिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचार्‍यांचा शुक्रवारपासून (दि.18) मुंबई येथे पायी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातून सुमारे सात हजार अधिकारी व कर्मचारी नाशिकमध्ये जमा झाले असल्याचा दावा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर कासार यांनी केला आहे. 

या लाँग मार्चमुळे राज्यभरातील आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातील ग्रामीण आरोग्य सेवेत कंत्राटी पद्धतीने सुमारे 18 हजार अधिकारी व कर्मचारी भरले आहेत. मात्र, शासन निर्णयानुसार आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागात भरती प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कंत्राटी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती.

एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी त्रिस्तरीय समिती स्थापनेसोबतच त्यात संघटनेच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचप्रमाणे कंत्राटी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना समायोजनाच्या दृष्टिकोनातून शासन भरतीप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यासोबत तीन महिन्यांत सर्वांना समायोजन करण्यात येईल, असेही आश्‍वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले होेते. मात्र, आश्‍वासनपूर्ती होत नसल्याचे दिसताच महासंघाच्या वतीने राज्यभरात पुन्हा 8 मेपासून काम बंद आंदोलनास सुरुवात झाली होती. या आंदोलनाची धार वाढवण्यासाठी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून (दि.18) मुंबईला लाँग मार्चचे आयोजन केले आहे.