Sat, Jul 20, 2019 15:01होमपेज › Nashik › नाशिक बाजार समितीकडून 30 गाळ्यांना कुलूप

नाशिक बाजार समितीकडून 30 गाळ्यांना कुलूप

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 28 2018 10:47PMपंचवटी : वार्ताहर  

पेठरोड येथील शरदचंद्र पवार बाजार समितीतील गाळेधारकांनी भाडेवाढ नाकारली म्हणून त्यांच्या 30 गाळ्यांना समितीने कुलूप ठोकले आहे. रितसर भाडेवाढ करीत असतानाही विरोध होत असल्याने कारवाई केल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. यामुळे मात्र, सभापतींविरोधात व्यापारी आणि संचालकांमध्ये नाराजी आहे. तर बेमुदत बंद आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याचे काही व्यापार्‍यांनी सांगितले.  

पेठरोड येथील मार्केट यार्डात टमाटा आणि डाळींब व्यापार्‍यांसाठी 148 गाळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या गाळ्यांना वर्षाकाठी 8 हजार रुपये भाडे आकारणी करण्यात आली होती. सभापती शिवाजी चुंभळे यांनी ही भाडे आकारणी चुकीची असल्याचे सांगत दहा बाय दहाच्या गाळ्याला प्रतिमहिना सहा हजार रुपये भाडेवाढ देण्याचा प्रस्ताव व्यापार्‍यांसमोर ठेवला होता. यामध्ये अनेकदा बैठका होऊन त्यामधून दहा बाय दहाच्या गाळ्याला प्रतिमहिना 2 हजार रुपये जवळपास निश्‍चित करण्यात आले होते. मात्र,त्यावरही व्यापारी आणि काही संचालक नाखूष असल्याने भाडेवाढीचा प्रस्ताव बारगळला होता. व्यापार्‍यांनी आणि काही संचालकांनी सभापती चुंभळे यांना प्रतिवर्षी असलेल्या भाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तो चुंभळे यांना मान्य नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, दहा बाय दहाच्या गाळ्याला प्रतिमहिना 2 हजार आणि जशी जागा वाढेल त्याप्रमाणे भाडे आकारणी करण्यात येईल. यामध्ये अनेक दिवसांपासून खलबत्ते सुरु होती. मात्र, बाजार समितीने थेट गाळ्यांना कुलूप लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जवळपास 30 गाळ्यांना कुलूप लावण्यात आले असून, जे व्यापारी भाडेवाढीला नकार देतील त्यांच्यावर यापुढे कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.