Thu, Jun 27, 2019 17:45होमपेज › Nashik › राज्यमंत्री पदापेक्षा अपशकुनाचीच चर्चा 

राज्यमंत्री पदापेक्षा अपशकुनाचीच चर्चा 

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:52PMनाशिक : प्रतिनिधी 

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकला स्थान मिळेल, असे सूचक विधान करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये चर्चेची राळ उडवून दिली. त्यामुळे नाशिकमध्ये मंत्रिपदाची लॉटरी कोणाला लागेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकला राज्यमंत्री पद दिले जाईल. मात्र, राज्यमंत्री पदावर विराजमान झालेले आमदार पुढील निवडणुकीत घरी बसले असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मंत्रिपदापेक्षा अपशकुनाचीच अधिक चर्चा रंगत आहे.

भाजपा सरकारने चार वर्षे पूर्ण केली असून, मंत्रिमंडळात नाशिकची उपेक्षा झाली आहे. दरवेळी मंत्रिमंडळ विस्तारावेळी नाशिकचे नाव आघाडीवर असते. पण, ऐनवेळी नाशिकरांच्या हाती निराशा पडते. नाशिककरांनी मोदी लाटेत भाजपाच्या तीन नगरसेवकांना थेट आमदार केले. त्यापैकी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी महापालिकेत एकहाती कमळ फुलविले. त्यामुळे राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. तर, प्रा. आ. देवयानी फरांदे यांचेदेखील नाव चर्चेत आहे. या दोघांनी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी, म्हणून देव पाण्यात ठेवल्याचे समजते. असे असले तरी नाशिक जिल्ह्याचा विचार करता राज्य मंत्रिपद हे अनेक मातब्बरांसाठी अपशुकनच ठरले आहे. मालेगावचे प्रशांत हिरे हे आघाडी सरकारमध्ये परिवहन राज्यमंत्री होते. मात्र, पुढील निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्‍का बसला होता. त्यानंतर हिरे घराण्याची दाभाडी मतदारसंघातील सद्दी संपुष्टात आली होती. तर, नाशिकमध्ये काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांचीदेखील हीच गत झाली होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना डॉ. बच्छाव यांना आरोग्य राज्य मंत्रिपद देण्यात आले होते.

मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ही यादी मोठी असून, त्यामध्ये सिन्‍नरचे माजी आमदार तुकाराम दिघोळे यांचादेखील समावेश आहे. तेदेखील युती सरकारच्या काळात सेनेच्या कोट्यातून ऊर्जा राज्यमंत्री होते. त्यांनादेखील पुढील निवडणुकीत माणिक कोकाटेंनी पराभवाची धूळ चारली. एकूणच ज्यांनी राज्य मंत्रिपद भूषविले त्यांना नाशिककरांनी घरी बसवले हा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे नाशिकमधून कोणाला मंत्रिपद मिळेल या चर्चेबरोबरच राज्यमंत्री पदावरील आमदाराच्या झोळीत पडलेली पराभवाची निराशा याचीदेखील खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.