Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Nashik › अनधिकृत बांधकाम प्रस्तावांची यादी संकेतस्थळावर

अनधिकृत बांधकाम प्रस्तावांची यादी संकेतस्थळावर

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 11:07PMनाशिक : प्रतिनिधी

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्राप्‍त 2550 प्रस्तावांची यादी मनपाच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी जाहीर करण्यात आली आहे. प्रस्ताव प्राप्‍त करून घेताना संबंधित मालमत्ताधारक तसेच आर्किटेक्ट यांना पोचपावती देण्यात आली नव्हती. यामुळेच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानंतर आता संबंधित मिळकतींची जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. 

शासनाच्या धोरणानुसार मनपा हद्दीतील 31 डिसेंबर 2015 पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे प्रशमन आकार लावून प्रशमित संरचना (कंपाउंडेड स्ट्रक्‍चर) म्हणून घोषित करण्यासाठी मनपाने प्रस्ताव मागविले होते. त्यासाठी 31 मे ही शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मनपाकडे शेवटच्या एका आठवड्यात 2900 हून अधिक प्रस्ताव प्राप्‍त झाले आहेत. त्यापैकी 2550 प्रस्ताव मनपाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. प्रशमित संरचना प्राप्‍त प्रस्तावाची यादी असे संकेतस्थळावर टाकण्यात आले असून, त्यात मालकाचे नाव, आर्किटेक्‍चरचे नाव, शिवार, प्लॉट क्रमांक, सर्व्हे नंबर, सिटी सर्व्हे नंबर व गट नंबर अशा स्वरूपाची माहिती देण्यात आली आहे. शहरात कपाटप्रश्‍न तसेच बाल्कनी, टेरेस व इतर स्वरूपाची अनेक बांधकामे अनधिकृत स्वरूपात आहेत. अशा अनधिकृत बांधकामांची संख्या सुमारे साडेसहा हजार इतकी आहे. त्यातील अनेक कामे ही नऊ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांसन्मुख असल्याने ही बांधकामे नियमित होणार आहे. यामुळे केवळ सहा आणि साडेसहा मीटर रस्त्यासन्मुख असलेल्या इमारती व बांधकामांचा प्रश्‍न प्रलंबित आहे.

एकूण अनधिकृत बांधकामाच्या 30 टक्के इतके बांधकाम शासनाच्या प्रशमित संरचनेनुसार नियमित होण्यास मदत होणार आहे. पुढील आठवड्यात प्रत्येक प्रस्तावाच्या अनुषंगाने त्या-त्या शिवारातील मालमत्तेच्या ठिकाणी जाऊन त्याची मोजमाप व छाननी केली जाणार आहे. त्यानुसार अहवाल तयार करून अनधिकृत बांधकामापैकी किती बांधकाम नियमित होऊ शकते तसेच त्यापोटी संबंधित मालमत्ताधारकांस किती शुल्क अदा करावे लागणार, याची माहिती दिली जाणार आहे. नदी, कालवा, निळ्या पूररेषेतील क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, खाण, पुरातत्त्व इमारत, डम्पिंग ग्राउंड, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र, बफरझोनमधील अनधिकृत विकास, संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित इमारत, रहिवासी सार्वजनिक निमसार्वजनिक, वाणिज्य व औद्योगिक झोन व्यतिरिक्‍त अन्य जागेवर केलेले बांधकाम अशा प्रकारची बांधकामे नियमित होणार नाहीत.

यांचे प्रस्ताव आहेत सर्वाधिक 

नगररचना विभागाकडे प्रशमित संरचनेअंतर्गत प्राप्‍त झालेल्या प्रस्तावांमध्ये शहरातील काही आर्किटेक्‍चरच्या प्रस्तावांची संख्या सर्वाधिक आहेत. त्यात आर्किटेक्ट विजय सानप, रवी अमृतकर, ऋषिकेश पवार, गौरव बडवे, अभिजित मालपुरे, मावाणी असोसिएट, योगेश व सतीश गायकवाड, अभिजित धांडे, अशोक जामदार, जितेंद्र जोशी, अविनाश कोठावदे, समीर मणियार, श्रीकांत सोहोनी यांचा समावेश आहे.