होमपेज › Nashik › बनावट नोटा छापणार्‍यांना जन्मठेप

बनावट नोटा छापणार्‍यांना जन्मठेप

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:44AMनाशिक :प्रतिनिधी 

बनावट नोटा छापून त्याची विक्री करणार्‍या दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्ञानेश्‍वर सीताराम पाटील (33, रा. अंबड लिंकरोड) आणि जावेद अब्दुल कादीर मनियार (40, रा. विनयनगर) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. 

बनावट नोटा छापून त्याची विक्री करणार्‍या दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्ञानेश्‍वर सीताराम पाटील (33, रा. अंबड लिंकरोड) आणि जावेद अब्दुल कादीर मनियार (40, रा. विनयनगर) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. 10 ऑक्टोबर 2014 रोजी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने दोघांनाही बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असताना रंगेहाथ पकडले होते. 

काही संशयित 100 रुपये चलनाच्या बनावट नोटा छापून त्यांची 50 रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती तत्कालीन गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकास मिळाली होती. त्यानंतर पथकाने बनावट गिर्‍हाईक पाठवून या तक्रारीची शहानिशा केली. त्यावेळी 10 ऑक्टोबर 2014 रोजी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील साती आसरा देवी मंदिराजवळ सापळा रचून ज्ञानेश्‍वर पाटील आणि जावेद मनियार या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासात पोलिसांनी दोघांकडून बनावट नोटा छापण्यासाठी लागणारा संगणक, प्रिंटर, कागद, कटिंग मशीन, हार्डडिस्क तसेच आणखीन 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा असा मुद्देमाल जप्‍त केला. 

बनावट नोटांची भारत प्रतिभूती मुद्रणालय आणि मुंबईतील कलिना प्रयोगशाळेतून तपासणी करण्यात आली. त्यात सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तत्कालीन तपासणी अधिकारी गंगाधर देवडे यांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. शिरीष कडवे आणि विद्या जाधव यांनी कामकाज पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. दोघांविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर दोघा आरोपींच्या नातलगांनी न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.