Thu, Jun 27, 2019 09:55होमपेज › Nashik › येवलेकरांच्या पाण्यासाठी भुजबळांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

येवलेकरांच्या पाण्यासाठी भुजबळांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी तत्काळ टँकर उपलब्ध  करून देण्यात यावे, असे पत्र माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी  केईएम रुग्णालयातून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना पाठविले आहे.

येवला तालुक्यात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मुळातच हा भाग  अवर्षण प्रवण आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी  टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. मागणी प्राप्त होताच तातडीने पाहणी करून टँकरला मंजुरी देणे आवश्यक असताना अनेक दिवस प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.गावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश, जलयुक्त शिवार योजनेत समावेश आदी निकषांची पडताळणी करताना प्रस्ताव मात्र धूळ खात असतात. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतांना देण्याऐवजी कालापव्यय केला जात असल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.संभाजीनगर-सावरगाव,बदापूर, आडगाव रेपाळ, पन्हाळसाठे व रहाडी या पाच गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रलंबित आहेत. तर कोळम खु, कोळम बु.,डोंगरगाव, खिर्डीसाठे-हनुमाननगर, पिंपळखुटे खु. अंतर्गत अहिरेवस्ती आणि कदमवस्ती अशा पाच गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत. तर नगरसूल ग्रामपंचायतीने एकोणवीस वाड्या-वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे टँकर सुरू करण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाने अनेक दिवसांपासून मंजुरी दिलेली नाही.

गणेशपूर,आडसुरेगाव, गारखेडे व देवठाण या चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर आहे. मात्र, ही गावे आजही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर असलेले 16 पैकी पाच टँकर अजूनही येवल्यात पोहोचलेले नाहीत. भीषण टंचाई  असतानाही 11 गावांचे प्रस्ताव अनेक दिवस विविध स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहेत ही अतिशय खेदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. टंचाईग्रस्त गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसलेले आहेत. शासकीय अधिकारी टंचाईकडे दुर्लक्ष करत आहेत अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. टँकरचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावे आणि या गावांमध्ये टँकर पोहोचले की नाही, याचा आढावा घेऊन दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे भुजबळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तुरुंगात असताना भुजबळ यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार सुरू ठेवला होता. या माध्यमातून त्यांचे मतदारसंघांकडेही लक्ष होते. जामीन मंजूर झाल्यानंतर ते सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजारपणाच्या काळातही त्यांनी मतदारांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्रप्रपंच केला आहे.