Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Nashik › गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमीच

गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमीच

Published On: Aug 19 2018 1:32AM | Last Updated: Aug 18 2018 11:04PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक विभागात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण सरासरी 75 मिलिमीटरने कमी असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत सरासरी 377 मिलिमीटर पावसाची नाेंंद झालेली असताना यावर्षी मात्र हेच प्रमाण 302 मिलिमीटर इतके आहे. 

यावर्षी पाऊस येऊन धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. 7 जूनला रात्री कोसळल्यानंतर पाऊस गायब झाला होता. थेट अखेरच्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावली.जुलैमध्ये मात्र बर्‍यापैकी पाऊस झाल्याने प्रमुख धरणांमधील साठाही समाधानकारक झाला. नाशिक विभागाचा विचार करता आतापर्यंत सरासरी एकूण 460 मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र 302 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यातही नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 465 मिलिमीटर पाऊस पडला आहे. 678 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. गेल्यावर्षी प्रत्यक्षात 602 मिलिमीटर पाऊस पडला होता. धुळे जिल्ह्यात 259 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 272 मिलिमीटर पाऊस झाला होता. नंदुरबार जिल्ह्यात 318 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी 522 मिलिमीटर पाऊस पडला होता. जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी 256 मिलिमीटर पाऊस झाला होता. यावर्षी 251 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नगरमध्ये गेल्या वर्षी 259 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली असताना यावर्षी 205 मिलिमीटर पाऊस झाला.

म्हणजे, विभागात गेल्यावर्षी सरासरी 377.20 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली असताना यावर्षी 302.20 मिलिमीटर पाऊस झाला. सरासरी 75 मिलिमीटर पाऊस कमी पडला. वेळेवर पाऊस नसल्याने त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला. पेरण्यांना उशीराने सुरूवात झाली. जो काही पाऊस झाला, त्यावर शेतकर्‍यांनी पिकांच्या पेरण्या तर केल्या पण, वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पुन्हा पावसाने दगा दिला. गुरूवारी नाशिक जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली. जोर फारसा नसल्याने पिकांना कितपत फायदा होईल, याविषयी तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.

शेतकर्‍यांची भिस्त रब्बी हंगामावर

पावसाच्या लहरीपणाचा परिणाम खरीप हंगामातील विविध पिकांच्या उत्पादनावर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकर्‍यांची भिस्त आता रब्बी हंगामावर आहे. खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र पाच लाख 75 हजार 591 हेक्टर असले तरी प्रत्यक्षात पेरण्या मात्र पाच लाख 80 हजार 300 हेक्टरवर झाल्या आहेत. म्हणजे, उद्दिष्टापेक्षा किंचित जास्त पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या आटोपल्या असल्या तरी अपेक्षित उत्पादन हाती येण्याविषयी मात्र साशंकता आहे. कारण, ज्या वेळी पिके वाढीच्या अवस्थेत होती, नेमक्या त्याचवेळी पाऊस गायब झाला होता. जवळपास पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागली होती. पाऊस परतला खरा. पण, पिकांची वाढ खुंटल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची भिस्त आता रब्बी हंगामावर आहे. खरिपातील घटणारे उत्पादन रब्बीत भरून काढण्याचा विचार शेतकरी करू शकतात. 

रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख 38 हजार 898 हेक्टर आहे. यात सर्वाधिक 70 हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी होणे अपेक्षित आहे. तसेच ज्वारीची पेरणी 4,400 हेक्टरवर तर मक्याची पेरणी 3,700 हेक्टरवर होणे अपेक्षित आहे. 4,100 हेक्टरवर हरभरा, तर 15,798 हेक्टरवर उसाची पेरणी होणार आहे. तसेच 200 हेक्टरवर इतर अन्नधान्य तर 300 हेक्टरवर इतर गळीत धान्याची पेरणी अपेक्षित आहे. रब्बीच्या पेरणीला ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, 15 सप्टेंबरपासून बियाणे बाजारात उपलब्ध होतील, असा दावा करण्यात आला आहे.