Tue, Apr 23, 2019 00:15होमपेज › Nashik › मातोरीत दुसर्‍या दिवशीही बिबट्याचे दर्शन

मातोरीत दुसर्‍या दिवशीही बिबट्याचे दर्शन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मातोरी शिवारातील साठे वस्तीवर बिबट्याने पाळीव कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याला चोवीस तास उलटत नाही तोच पुन्हा बिबट्याने बछड्यासह त्याच ठिकाणी दर्शन दिल्याने मातोरीकरांमध्ये आणखी दहशत वाढली आहे. या घटनेची वनविभागानेही तत्काळ दखल घेतली असून, मातोरी शिवारात सोमवारी (दि.27) पिंजरा बसविण्यात येणार आहे.   

मातोरी शिवारातील फकिरा साठे यांच्या घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर शनिवारी (दि.25) पहाटे बिबट्याने हल्ला केला. यात त्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच रविवारी (26) पहाटे 3.30 ते 4 वाजेदरम्यान बिबट्याने साठे कुटुंबीयांना घरासमोरच दर्शन दिले. रात्री जोरजोराने भुंकणारे कुत्रे अचानक शांत झाल्याने साठे कुटुंबीयांना बिबट्या आल्याची शंका आली. त्यांनी खिडकीतून घराबाहेर नजर ठेवली. काही वेळातच बिबट्या आपल्या बछड्यासह आल्याचे पाहून साठे कुटुंबीय घाबरून गेले. शनिवारी साठे यांच्या कुत्र्यावर ज्या ठिकाणी हल्ला केला होता, त्याठिकाणी वास घेऊन बिबट्या मार्गस्थ झाला. पहाटेची ही आपबिती दै. ‘पुढारी’शी कथन करतानादेखील साठे कुटुंबीय प्रचंड भयभीत दिसत होते. 

साठे यांच्या घरापासून अवघ्या पाचशे मीटरवर पाझर तलाव आहे. तलावाच्या बाजूला  सांडपाण्याचा नाला आहे. नाल्यालगत दाट झाडी असल्याने बिबट्याला लपायला जागा आहे. वनविभागाने याच भागात पिंजरा बसविल्यास बिबट्या पिंजर्‍यात अडकू शकतो, असेही साठे म्हणाले.

शेतकर्‍यांना दुहेरी चिंता

बिबट्याच्या दहशतीने मातोरीकर रात्रीच नव्हे, तर दिवसाही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतावर जावेच लागते. रविवारपर्यंत कसेबसे पिकांना पाणी देता आले, मात्र सोमवारपासून विजेची वेळ रात्री 12 ते सकाळी 6.30 अशी असल्याने पिकांना पाणी द्यायला जायचे कसे, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. एकीकडे बिबट्याची दहशत दुसरीकडे पिकांचे नुकसान या दुहेरी चिंतेत शेतकरी आहेत.