Tue, Jul 16, 2019 01:55होमपेज › Nashik › चांदवड येथे बिबट्या जेरबंद

चांदवड येथे बिबट्या जेरबंद

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:16PMचांदवड : वार्ताहर

तालुक्यातील साळसाने-निंबाळे गावच्या शिवारातून गेलेल्या पुणेगाव डावा कालव्याच्या मोरीत अडकलेला सातवर्षीय  बिबट्या जेरबंद करण्यात चांदवडच्या वनविभागाला यश आले आहे.तालुक्यातील साळसाने-निंबाळे गावच्या शिवारातील पुणेगाव डावा कालव्यावरील रस्त्यावर ठाकरे वस्ती आहे. तेथील प्रशांत ठाकरे, ऋषिकेश ठाकरे व आदित्य ठाकरे हे दोन विद्यार्थी शुक्रवारी (दि.6) सकाळी शाळेत जात होते. त्यावेळी त्यांना बिबट्यासारखा प्राणी कालव्यावर असल्याचे दिसले. बिबट्या दिसताच त्यांनी घराकडे पळ काढत घरच्यांना कालव्याजवळ बिबट्या असल्याचे सांगितले. 

यामुळे वस्तीवरील व आजूबाजूचे सर्व शेतकरी कालव्याजवळ गेले असता, बिबट्या घाबरून पुणेगाव डावा कालव्या मोरीत जाऊन लपला. या घटनेची माहिती येथील शेतकरी हरिभाऊ सोनवणे, सोमनाथ सोनवणे, सरपंच नंदू चौधरी यांनी चांदवडच्या वनविभागाला त्वरित कळवली. तालुका वन अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वनपाल वंदना खरात, वनरक्षक गंगाधर पवार, विजय पगार,  सोनाली वाघ, वनमजूर ज्ञानेश्‍वर पगारे, नामदेव पवार, भरत वाघ, अशोक शिंदे, अशोक आहेर, दयानंद कासव आदी पिंजर्‍यासह घटनास्थळी दाखल झाले. वंदना खरात यांनी बिबट्या कालव्याच्या मोरीत लपलेला असल्याचे पाहून मोरीच्या एका बाजूने पिंजरा लावला. तर दुसर्‍या बाजूने लोखंडी पलंग, जाळीच्या सहाय्याने मोरी बंद केली. पलंग लावलेल्या बाजूने फटाके फोडण्यात येऊन बिबट्या घाबरून तो पिंजर्‍याच्या बाजूने आला असता अन् अलगद पिंजर्‍यात बंद झाला. यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

Tags : Nashik, Leopard, captured, Chandwad