होमपेज › Nashik › बिबट्याचा हल्‍ला; सहा मेंढ्या ठार

बिबट्याचा हल्‍ला; सहा मेंढ्या ठार

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 15 2018 11:23PMमालेगाव : वार्ताहर

तालुक्यातील गाळणे येथे बिबट्याने रविवारी (दि. 15) मध्यरात्री मेंढ्यांवर हल्ला केला. यात सहा मेंढ्या ठार झाल्या आहेत. या भागात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेत शिवारात रहाणार्‍या शेतकर्‍यांमध्ये तसेच जंगलात जनावरे चारणार्‍या पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहेत. वन विभागाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आलेली आहे.

गाळणे येथील आबा काळू कर्नर यांच्या शेतातील मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने  मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात सहा मेंढ्या ठार झाल्या आहेत. हल्ला केल्याची चर्चा गावात पसरताच ग्रामस्थांनी कर्नर यांच्या वस्तीकडे धाव घेऊन मदत केली. वन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यावेळी वनविभागाच्या कर्मचारी, तलाठी व ग्रामसेवक यांनी धाव घेत पंचनामा केला. यापूर्वी 10 मे रोजी कौळाणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाला. तर दुंधे शिवारात शांताराम खैरनार यांच्या दहा शेळ्या बिबट्याने ठार केल्यामुळे पिंजर्‍याची मागणी होत आहे.

तीन तासांनंतर बिबट्या विहिरीतून बाहेर

घोटी : वार्ताहर

भक्ष्याच्या शोधात धामणगाव येेथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने तीन तासांच्या अथक प्रयत्नातून वाचवले. धामणगाव येथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि.15) सकाळी उघडकीस आली. वनपरिमंडळ अधिकारी, कर्मचार्‍यांनी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले. पाऊस सतत सुरू असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.

वनपरिक्षेत्रांतर्गत भंडारदरा परिमंडळातील धामणगाव येथे तुकाराम खंडू गाढवे यांची शेती आहे. काही दिवसांपूर्वी या भागातील शेतात बिबटे दिसून येत असल्याने माहिती वनअधिकार्‍यांना मिळाली होती. रविवारी सकाळी शेतमालक तुकाराम गाढवे शेतात गेले असता त्यांच्या कठडे नसलेल्या विहिरीत एक बिबट्या पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी ही माहिती वनपरिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना दिली. जाधव यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांचे मार्गदर्शन घेत बिबट्याला बाहेर काढण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना सुरू केल्या. 

इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपरिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांचे पथक तत्काळ बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने विहिरीत पिंजरा टाकला. त्या पिंजर्‍यात बिबट्या शिरताच त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बिबट्यावर आवश्यक औषधोपचार करून नंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले. या बचाव मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव, संतोष बोडके, व्ही. व्ही. दिवे, एफ. जे. सय्यद, रेश्मा पाठक, श्रावण बगाड, विजय चौधरी आदींनी परिश्रम घेतले.