Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Nashik › विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादीचा धुव्वा

शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांची बाजी

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:51PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांच्यावर 167 मतांनी दणदणीत विजय मिळवला. दराडे यांच्या विजयासाठी छगन भुजबळ यांची मदत मिळाल्याची चर्चा आहे, तर राष्ट्रवादीला पाठिंबा देणारी भाजपाही तोंडघशी पडली आहे. दरम्यान, निकालानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत प्रचंड जल्लोष केला. 

जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे व अपक्ष परवेझ कोकणी असे तीन उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी कोकणी यांना भाजपाने अखेरपर्यंत झुलवत ठेवल्याने त्यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. कोकणी यांनी त्यांच्या पाठीशी असलेली मते शिवसेनेकडे वळवली होती. तर दुसरीकडे भाजपाने पालघरचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या अ‍ॅड. सहाणे यांना पाठिंबा घोषित केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर गेल्या सोमवारी (दि. 21) निवडणूक होऊन त्यात 100 टक्के मतदान झाले होते. एकूण 644 मतदारांनी हक्‍क बजावला होता. मतमोजणीस गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल भवनमध्ये प्रारंभ झाला. 10 वाजेच्या सुमारास निकाल हाती आला. त्यानुसार दराडे यांना 399, तर अ‍ॅड. सहाणे यांना 232 मते पडली. शिवसेनेने बाजी मारत मित्रपक्ष भाजपासह सर्वपक्षीयांना धूळ चारली. हा निकाल नाशिक ‘दत्तक’ घेणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. जिल्हाधिकार्‍यांनी दराडे यांच्या विजयाची घोषणा करताच सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.

अन् सहाणे यांचा काढता पाय... : सकाळी 8 वाजता दोन टेबलवर मतमोजणी सुरू झाली. जिल्हाधिकार्‍यांनी 9.15 च्या सुमारास एकूण 644 मतांपैकी 13 मते अवैध ठरवली व उर्वरित 631 वैध मतांमधून निवडून येण्यासाठीचा 316 मतांचा कोटा जाहीर केला. मात्र, त्याचवेळी पराभव नजरेत आल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.

छगन भुजबळांच्या मदतीची चर्चा

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना विजयासाठी माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी मदत केल्याची चर्चा आहे. खुद्द दराडे यांनीच विजयानंतर हा दावा केला असून, भुजबळ यांचे समर्थक आमदार जयवंत जाधव यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. तथापि, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

‘मातोश्री’चे आमंत्रण

आ. नरेंद्र दराडे व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना ‘मातोश्री’वरून भेटीचे आमंत्रण मिळाले आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 25) सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत यांची भेट घेणार असल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी दिली.  

गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करीत होतो. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय असा सामना होता. तरीही सेनेने स्वबळावर निवडणूक लढवत विजय खेचून आणला. कार्यकर्त्याचे आभार मानतो.  - नरेंद्र दराडे, नवनिर्वाचित आमदार

विकास आणि जातीपातविरहित या दृष्टिकोनातून निवडणूक लढवली. मात्र, निवडणुकीत धनशक्‍तीचा वापर झाला. आमच्याकडे 440 संख्याबळ असूनही काही मतदारांनी विकासापेक्षा धनशक्‍तीला प्राधान्य दिले.    - शिवाजी सहाणे, उमेदवार, राष्ट्रवादी