होमपेज › Nashik › भाजपा, राष्ट्रवादीत अद्यापही सामसूम

भाजपा, राष्ट्रवादीत अद्यापही सामसूम

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:35AMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जविक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असताना दुसरीकडे भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्याप सामसूम आहे. राष्ट्रवादीकडे अपेक्षित संख्याबळ नसले तरी या पक्षाकडून निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांची संख्या मात्र कमी नाही.

शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा करून नरेंद्र दराडे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. शिवसेनेशी युती करण्याची इच्छा असलेल्या भाजपाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतरही या पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. दरम्यानच्या काळात ना बैठक ना चर्चा, अशी परिस्थिती या पक्षात दिसून येत असल्याने उमेदवार देण्याविषयीच साशंकता आहे.

पक्षाकडून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात न आल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जवळपास अशीच परिस्थिती दिसून येत आहे. काल-परवापर्यंत पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमात गुंतलेल्या राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर विधान परिषदेच्या निवडणुकीविषयी उदासीनताच दिसून येत आहे. निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असले तरी निवडून येण्याइतके संख्याबळ नसल्याने पक्षात सामसूम दिसून येत आहे. शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्यानंतर भाजपाची छुपी मदत मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पण, भाजपाने भूमिका स्पष्ट केली नसल्यानेच राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. 

मनोमीलनातच वाया जातोय वेळ

दराडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मात्र त्यांनी अखेरचा दिवस म्हणजे 3 मे निवडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दराडे यांच्या उमेदवारीवरून सेनेत अंतर्गत खदखद असल्याने मनोमीलन करण्यातच या पक्षाच्या नेत्यांचा वेळ जात आहे. दराडे यांनी वैयक्तिकरीत्या आधीच प्रचाराला सुरुवात केली असली तरी पक्षीय पातळीवरून मात्र प्रारंभ झाल्याचे दिसत नाही.