Thu, Aug 22, 2019 12:27होमपेज › Nashik › भाजपाची भूमिका आज जाहीर होणार

भाजपाची भूमिका आज जाहीर होणार

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 11:44PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीतील आपली भूमिका भाजपा आज (दि.20) जाहीर करणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीत यासंदर्भातील निर्णय नगरसेवकांना कळवून त्याचठिकाणी पक्षादेश बजावला जाणार आहे. यामुळे पक्षाचा हा कौल नरेंद्र दराडे, शिवाजी सहाणे की परवेझ कोकणी यांच्या पारड्यात पडतो यावर संबंधित उमेदवाराच्या विजयाचे गणित ठरणार आहे.

शिवसेनेने नरेंद्र दराडे, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीने अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपाचा उमेदवार कोण असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. परंतु, भाजपाने शेवटपर्यंत उमेदवारच जाहीर केला नाही. भाजपाच्या संपर्कात असलेले मात्र अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या परवेझ कोकणी यांच्यामुळे काल -परवापर्यंत भाजपा नगरसेवकांमध्ये आणि इतरही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे भाजपाची भूमिका काय असे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. कोकणी हे भाजपाचेच उमेदवार असल्याचे बोलले जात होते.

परंतु, भाजपाने शेवटपर्यंत कोकणी यांचे नावच घेतले नाही. यामुळे कोकणी यांनीही यानंतर सारवासारव करून निवडणुकीतून हात आखडता घेतला आहे. आता भाजपा कुणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागले असून, पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत नाशिकला एका हॉटेलमध्ये सायंकाळी 5 वाजता होणार्‍या बैठकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याविषयी नगरसेवकांना निर्णय कळविला जाणार आहे.

या बैठकीसाठी नाशिक व मालेगाव मनपा तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच पंचायत समितीच्या सदस्यांना बोलविण्यात आले आहे. त्यात पक्षादेश बजावला जाणार आहे. पालघर येथे लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाबरोबर दगाफटका केल्याने त्याचा बदला घेण्याच्या दृष्टीनेच शिवसेनेला विरोध करत आघाडीच्या उमेदवाराशी हातमिळवणी होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. असे झाले तर भाजपाचा हा निर्णय दराडेंसाठी नुकसानीचा ठरू शकतो.

आज होणार्‍या बैठकीत पक्षश्रेष्ठींकडून घेतल्या जाणार्‍या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. बैठकीसाठी सर्व नगरसेवक व सदस्यांना बोलविण्यात आले आहे. पक्षाचा आदेश आमच्यासाठी अंतिम राहील. काही दिवसांपासून नाहक अफवा आणि वावड्या उठविल्या जात होत्या. त्याचे उत्तर आज दिले जाईल.  - बाळासाहेब सानप, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजपा