Wed, Apr 24, 2019 19:36होमपेज › Nashik › .. तर भुजबळांसाठी निवडणूक ठरू शकते विजयी सलामी 

भुजबळांसाठी निवडणूक ठरेल विजयी सलामी

Published On: May 11 2018 1:42AM | Last Updated: May 11 2018 1:42AMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार छगन भुजबळ यांची कुणाला साथ मिळते याकडे लक्ष लागून आहे. मागील निवडणुकीत सहा वर्षे ज्यांच्याबरोबर न्यायालयीन टक्‍कर दिली ते शिवाजी सहाणे आता राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवत असल्याने भुजबळ काय पावले उचलणार हे निवडणुकीनंतरच समजेलच. परंतु, निवडणुकीत अ‍ॅड. सहाणे विजयी झाले तर भुजबळांची राजकारणातील वापसी त्यांच्यासाठी विजयी सलामी ठरू शकते.

मागील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयंत जाधव यांच्यात संघर्षाची लढत झाली आणि हा संघर्ष पुढे सहा वर्षे न्यायालयीन लढ्याच्या रूपाने सुरू राहिला. आजही या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. अशातच निवडणुकीच्या निमित्ताने आमदार जाधव यांना घरी बसवून आता अ‍ॅड. सहाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरले आहेत. या प्रकारामुळे राजकारणात कधी आणि कशी उलथापालथ होईल याचा अजिबात भरवसा नाही. आजचे शत्रू उद्याचे मित्र याच राजकारणात पाहावयास मिळतात हे अ‍ॅड. सहाणे व जाधव यांचे उदाहरण म्हणता येईल. तुरुंगातून नुकतेच बाहेर आलेल्या भुजबळांचे दोनच दिवसांपूर्वी अ‍ॅड. सहाणे यांनी आशीर्वाद घेतले.

या भेटीमागील अर्थ सहाणे यांना उमगला असेल यामुळेच त्यांनी शक्य तितक्या लवकर भुजबळांची भेट घेऊन निवडणुकीत विजयी करण्यासाठी  साकडे घातले असावेे. आता भुजबळांनी नेमका काय आशीर्वाद दिला असेल हे निवडणुकीनंतरच समोर येईल. निवडणुकीतील निकालात काही बरेवाईट झाले तर त्याचे खापर भुजबळांवरच फोडले जाईल हेही तितकेच सत्य आहे. कारण याच भुजबळांच्या उमेदवाराबरोबर नव्हे तर कट्टर समर्थक असलेल्या आमदार जयंत जाधव यांच्याबरोबर सहाणे यांची न्यायालयीन लढाई सर्वांनाच ठाऊक आहे. यामुळे सहाणेंना निवडणुकीत काही दगाफटका झाला तर भुजबळांमुळे झाला असे म्हणणारे काही कमी नाहीत. परंतु, ही निवडणूक छगन भुजबळांसाठी नवी ताकद निर्माण करून देणारी आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लगेचच पक्षाकरिता पहिला विजय मिळवून देणारी ठरणार आहे. यामुळे भुजबळांच्या आगामी रणनीतीकडे देखील अनेकांचे लक्ष लागून आहे