Tue, Jul 23, 2019 02:23होमपेज › Nashik › विधान परिषदेसाठी पहिल्याच दिवशी दराडे, कोकणी, सहाणेंनी नेले अर्ज

विधान परिषदेसाठी पहिल्याच दिवशी दराडे, कोकणी, सहाणेंनी नेले अर्ज

Published On: Apr 27 2018 12:58AM | Last Updated: Apr 26 2018 10:47PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषद स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि.26) पाच उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. अर्ज नेणार्‍यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक परवेझ कोकणी, अ‍ॅड. शिवाजी सहाणे, नुरजहाँ पठाण यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षानेही अर्ज घेतला आहे. 

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी पाच अर्जांची विक्री झाली. यामध्ये नरेंद्र दराडे यांच्यासाठी नीलेश घुगे यांनी अर्ज नेला आहे. परवेझ कोकणी यांच्यावतीने खतीब मुनीर यांनी अर्ज स्वीकारला. अ‍ॅड. सहाणे यांच्यासाठी रमेश जगताप, तर नुरजहाँ पठाण यांच्यातर्फे धर्मेंद्र जाधव यांनी अर्ज नेला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून पवन ओबेरॉय यांनी अर्ज नेला. 

निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, शिवसेनेने यापूर्वीच आपला उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. भाजपाकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, कोकणी व अ‍ॅड. सहाणे हे इच्छुक आहेत. सद्यस्थितीत पक्षातर्फे कोणाचीही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्याचवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रसने नाशिकसह राज्यातील सहाही जागांवर आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही जागा आघाडीत राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असली तरी विद्यमान आमदार जयंत जाधव यांना पुन्हा रिंगणात उतरावयाचे की, दुसरा उमेदवार द्यायचा यावर पक्षात खल सुरू आहे.  

अर्ज भरण्यासाठी 3 मे ही अखेरची मुदत आहे. परंतु, यामध्ये 28 ते 1 मे या काळात सुट्ट्या असल्याने अर्ज दाखल करता येणार नाही. परिणामी शुक्रवार (दि. 27) तसेच 2 व 3 मे असे तीन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहे. दरम्यान, भाजपा आणि आघाडीचा उमेदवार आजही अंतिम झालेला नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अखेरच्या दोन दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होईल.

अंतिम यादी 2 मे रोजी प्रसिद्ध

जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी 644 जणांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नाशिक मनपाचे 127, मालेगाव मनपाचे 89 तसेच जिल्हा परिषदेच्या 73 सदस्यांसह नगरपालिका, नगरपंचायती, तसेच पंचायत समितीचे सभापती व देवळाली कॅन्टोमेंन्ट बोर्डाच्या सदस्यांचा समावेश आहे. प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. हरकती दाखल झाल्यास त्यावर सुनावणी घेऊन 2 मे रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.