Sat, Feb 16, 2019 23:09होमपेज › Nashik › भिडेंविरूद्ध कायदेशीर सल्ला घेण्याचे आदेश

भिडेंविरूद्ध कायदेशीर सल्ला घेण्याचे आदेश

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:49PMनाशिक : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी नाशिक येथे केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी मनपा वैद्यकीय विभागाने वकिलांकडून मार्गदर्शन मागविले आहे. याबाबत मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी वकिलांचे मार्गदर्शन घेऊन कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांना दिले आहेत. 

गेल्या 13 जुलैला वैद्यकीय विभागात झालेल्या पीसीपीएनडीटी समितीच्या बैठकीत भिडे यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या समितीच्या सर्वच सदस्यांचे एकमत होऊन त्यानुसार आयुक्‍तांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार होता. तशी माहितीही वैद्यकीय विभागाकडून आयुक्‍त मुंढे यांना दोन दिवसांपूर्वी देण्यात आली असता त्यांनी कायदेशीर मार्गदर्शन घेऊन त्यानुसार सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतरच प्रस्ताव आपल्याकडे सादर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आता वैद्यकीय विभागाने समितीच्या बैठकीत झालेली चर्चा व यापूर्वी करण्यात आलेल्या चौकशीचे कागदपत्र वकिलांकडे सादर करून मार्गदर्शन मागविण्याची तयारी सुरू केली आहे.

नाशिक येथील एका सभेत भिडे गुरूजी यांनी गर्भलिंग निदान कायद्याचा भंग करणारे वक्‍तव्य केले होते. याच कायद्याचा आधार घेत वैद्यकीय विभागाने चौकशी केली असता त्यात ते दोषी आढळून आले होते. याच निष्कर्षाच्या आधारे या विभागाने भिडे गुरुजींना नोटीस बजावून खुलासा मागितला होता.

परंतु, जवळपास एक महिन्यातही भिडे यांच्याकडून कोणताच खुलासा प्राप्‍त न झाल्याने पीसीपीएनडीटी समितीची बैठक बोलविली होती. या समितीत बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, सामाजिक व सेवाभावी संस्थांचे तीन प्रतिनिधी, कायदेशीर सल्लागार तसेच वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकमताने भिडे यांच्याविरूद्ध न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.