Sun, Jan 19, 2020 16:40होमपेज › Nashik ›  क्रांतिवीर पॅनलची आघाडी : क्रां.नाईक संस्थेत सत्ताधार्‍यांना धक्का

 क्रांतिवीर पॅनलची आघाडी : क्रां.नाईक संस्थेत सत्ताधार्‍यांना धक्का

Published On: Jul 21 2019 9:11PM | Last Updated: Jul 21 2019 9:11PM
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील  मविप्र संस्थेनंतर अग्रगण्य असलेल्या  क्रांतिवीर व्ही.एन.नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाच्या क्रांतिवीर पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी प्रगती पॅनलवर विजय मिळविला  आहे. रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार तालुका संचालक पदाच्या आतापर्यंत मतमोजणी झालेल्या 15 पैकी  14 जागा क्रांतिवीरने तर अवघ्या एका जागेवर सत्ताधारी प्रगती पॅनलला विजय मिळविता आला.    
दरम्यान,हाती आलेल्या वृत्तानुसार प्रगती पॅनलचे सहचिटणीस पदाचे उमेदवार तानाजी जायभावे 252 मतांनी विजयी झाले तर सरचिटणीस पदाचे प्रगती पॅनलचे उमेदवार हेमंत धात्रक हे क्रांतिवीर पॅनलचे सरचिटणीस पदाचे उमेदवार माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांचे पुत्र अभिजित दिघोळे यांच्यापेक्षा 20 मतांनी आघाडीवर होते.  रविवारी (दि.21) सकाळी 8 वाजेदरम्यान गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे मतमोजणीस सुरूवात झाली. सुरूवातीला मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येऊन गठ्ठे तयार करण्यात आले.  शनिवारी 79 टक्के मतदान झाले होते. मतदानास सभासदांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही निवडणूक सत्ताधार्‍यांना धक्का देणारी वा चुरशीची ठरेल असा कयास बांधला जात होता. रविवारी झालेल्या मतमोजणीमुळे या अंदाजाला पुष्टी मिळाली.  मतदारांनी यंदा सत्ताधारी गटाला हुलकावणी दिली आहे.
दोन्हीही पॅनल्सच्या समर्थकांनी सकाळपासून लॉन्सबाहेर गर्दी केली होती, ही गर्दी सायंकाळी वाढतच गेली. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान प्रत्यक्ष मोजणीस सुरूवात झाल्यानंतर पहिल्या पाच जागांवरील कल हाती येताच लॉन्सबाहेरील समर्थकांची संख्या कमी जास्त झाली. सायंकाळनंतर सुमारे 14 जागांवर क्रांतिवीर पॅनल आघाडीवर असल्याची वार्ता पसरताच या पॅनलच्या समर्थकांनी हळूहळू मतमोजणी केंद्राच्या परिसरात धाव घेतली. या मतमोजणीसाठी जिल्हाभरातून सभासद व दोन्ही पॅनल्सचे समर्थक शहरात हजर होते. 
 मतमोजणी कर्मचार्‍यांसाठी जेवणाच्या व्यवस्थेवर दोन्हीही पॅनल्सच्या कार्यकर्त्यांनीच ताव मारल्याने कर्मचार्‍यांची चांगलीच गैरसोय झाली.  मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही कल हाती येताच जेवणासाठी विश्रांती घेण्यात आली. यावेळी निवडणूक कर्मचार्‍यांसाठी जेवणाची व्यवस्था असणार्‍या विभागात अन्नपदार्थ शिल्लक नसल्याने याबाबत तक्रार सुरू झाल्यानंतर या जेवणावर कार्यकर्त्यांनीच आडवा हात मारल्याचे वास्तव समोर आल्यानंतर काही वेळ मतमोजणीचे कामही ठप्प झाले होते. यानंतर कर्मचार्‍यांच्या जेवणासाठी पुन्हा तजवीज सुरू झाल्यानंतर सायंकाळी त्यांच्या जेवणास मुहूर्त लागला. 
   
समर्थकांचा सायंकाळपासून  जल्लोष 
दिवसभर संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेने सायंकाळनंतर गती घेतली. क्रांतिवीर पॅनलने काही जागांवर आघाडी मिळविल्यानंतर मतदानकेंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा केला. यानंतर सहचिटणीस पदावर प्रगती पॅनलचे तानाजी जायभावे यांनी सुमारे अडीचशे मतांनी विजय मिळविताच प्रगती पॅनलच्या आशाही पल्लवीत झाल्या. यापाठोपाठ सरचिटणीस पदाचे प्रगती पॅनलचे उमेदवार हेमंत धात्रक यांनी आघाडी घेतली. यानंतर प्रगतीच्या समर्थकांचीही उपस्थिती मतदान केंद्राबाहेर वाढली. दोन्ही बाजूचे समर्थक बहुसंख्येने एकत्रित आल्याने पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

दुसर्‍या दिवशीही वाहतूक कोंडी
शनिवारी मतदानाच्या दिवशी हजारो सभासदांच्या उपस्थितीमुळे डोंगरे मैदान वाहनांच्या गर्दीमुळे गच्च झाले होते. यावेळी गंगापूर रोड आणि कॉलेजरोड परिसराला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. रविवारी मतमोजणीच्या वेळीही चोपडा लॉन्स परिसर आणि डोंगरे मैदान परिसरात हजारो कार्यकर्ते आणि त्यांच्या वाहनांच्या उपस्थितीमुळे वाहतूक कोंडीची पुनरावृत्ती झाली.