Fri, Jul 19, 2019 07:20होमपेज › Nashik › लॉ सीईटीत गोंधळ

लॉ सीईटीत गोंधळ

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 22 2018 11:02PMनाशिक : प्रतिनिधी

शहरात बॅचलर ऑफ लॉ (पाच वर्षे) या अभ्यासक्रमासाठी रविवारी (दि. 22) घेण्यात आलेल्या ऑनलाइन सीईटी परीक्षेत 25 ते 30 विद्यार्थ्यांना मूळ ओळखपत्राअभावी परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी, काही काळ केंद्रावर गोंधळ निर्माण झाला.

वडाळा जॉगिंग ट्रॅक येथील आयओएन झोन या परीक्षा केंद्रावर बॅचलर ऑफ लॉ अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची वेळ सकाळी 10 वाजेची देण्यात आली होती. मात्र, अनेक विद्यार्थी हे 9 वाजेपासूनच केंद्रावर हजर झाले होते. परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. मात्र, यावेळी केंद्रावरील अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना  प्रवेश देताना ओळखपत्रांच्या मूळ प्रती असलेल्यांनाच आतमध्ये सोडण्यात आले. परिणामी, ज्यांच्याकडे ओळखपत्राची झेरॉक्स आहे, अशा विद्यार्थ्यांना सीईटी देता आली नाही.

दोन तासांच्या सीईटी परीक्षेसाठी मूळ ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याचे विद्यार्थ्यांना ऐनवेळी सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्रावरील अधिकार्‍यांना परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. मात्र, अधिकार्‍यांनी मूळ ओळखपत्र नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारला. परिणामी, संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित पाटील यांनी घडलेल्या प्रकाराबाबत सहसंचालकांशी चर्चा केली. तसेच केंद्रचालकांना निवेदन देण्यात आले. मूळ ओळखपत्रामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Tags : nashik, nashik news, Law, CET, confusion,