Wed, Jul 17, 2019 10:11होमपेज › Nashik › लासलगावी कांदा दरात ३०० रुपयांची वाढ

लासलगावी कांदा दरात ३०० रुपयांची वाढ

Published On: Feb 04 2018 2:00AM | Last Updated: Feb 04 2018 1:56AMलासलगाव : वार्ताहर

केंद्राने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य दर 700 डॉलरवरुन शून्य डॉलर केल्याची घोषणा करताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा विंचूर उपबाजार आवारात कांदा दरात 300 रुपयांची  वाढ झाली.

आवक वाढल्याने गेल्या आठवडाभरात 1400 रुपयांनी गडगडलेले कांदा भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यातीला चालना देण्यासाठी 700 डॉलर प्रति टनवर असणारे किमान निर्यातमूल्य अखेर शुन्यावर आणले. काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल सरासरी 2800 रुपयांवर असणारे भाव 1400 रुपयांपर्यंत खाली उतरले. आठ दिवसांमध्ये दर 50 टक्क्यांहून अधिक उतरल्यामुळे कांदा उत्पादक चिंताग्रस्त झाला होता. सरकारने तत्काळ किमान निर्यात मूल्य हटविल्याने कांदा निर्यात होऊनभाव स्थिर होतील, असा अंदाज आहे.

निर्यात मूल्य घटविण्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे लासलगाव बाजार समितीचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. कांद्याचे भाव कोसळत असताना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.
    - जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती

निर्यात मूल्य हटविल्याने अघोषीत निर्यात बंदी संपुष्टात येऊन निर्यातीस चालना मिळण्यास मदत होईल आणि बाजारभाव स्थिर राहतील. शेतकर्‍यांना दोन पैसे मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
    - चांगदेवराव होळकर, माजी उपाध्यक्ष, नाफेड