Sat, Mar 23, 2019 01:57होमपेज › Nashik › द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली

द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:47PM

बुकमार्क करा
लासलगाव : प्रतिनिधी

थंडीचा पारा घसरला की गुलाबी थंडी पडली, असे म्हटले जाते. मात्र, हीच गुलाबी थंडी कही खुशी तर कही गम घेऊन येत आहे. गहू उत्पादकांसाठी थंडी लाभदायक असली तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र झोप उडवणारी ठरत आहे. शुक्रवारी (दि.29) सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 6.5 अंश सेल्सिअस इतकी झाल्याची माहिती वेधशाळा निरीक्षक आर. जे. मानकर यांनी दिली. या अगोदर 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची गुरुवारी नोंद झाली होती. चांगल्या थंडीमुळे निसावलेल्या गहू पिकाचे उत्पन्न वाढ होण्यास मदत होत आहे तर याच वाढत्या थंडीमुळे वेळेवर छाटणी झालेल्या व तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याच्या धोक्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. द्राक्ष पिकात ज्या बागा आता काढणीस आलेल्या आहेत किंवा येऊ शकतात या लोकांना या कमी तापमानाचा फटका बसू शकतो, असा अंदाज कृषितज्ज्ञ व्यक्त करीत आहे.

नाशिक जिल्हा म्हणजे राज्यातील द्राक्षपंढरी. याच द्राक्षपंढरीमध्ये गहु पिकाचे चांगलेच उत्पादन घेतले जाते. येथे असलेल्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडीच्या गहु संशोधन केंद्रामध्ये शुक्रवारी (दि. 29) पहाटे तापमानाची नोंद 6.5 अंश सेल्सिअस झालेली आहे. हे तापमान 2017 च्या वर्षीचे नीचांकी तापमान झाले. ही थंडी वेळेवर पेरणी झालेल्या तसेच उशिराही पेरणी झालेल्या गहु उत्पादकांना उत्पादनाची, चांगल्या पिकाची शाश्‍वती देत आहे. तर वेळेवर छाटणी झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची मात्र या घसरत्या थंडीच्या पार्‍याने झोप उडवली आहे. उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षबागांना मात्र थंडीचा फायदा होत आहे. गहू पिकाला लाभदायक असलेल्या थंडीमुळे गहू पीक जोमात येणार असल्याने गहु उत्पादक शेतकरी खुशीमध्ये आहे. गहु चांगला निसावण्यास थंडीची मदत होणार आहे, तर वाढत्या थंडीमुळे द्राक्षाच्या  फुगवणी थांबून राहिल्या आहेत. या थंडीचा पारा अजून जर घसरत चालला, तर द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे.