Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Nashik › कांद्यावरील  निर्यातमूल्य रद्द

कांद्यावरील  निर्यातमूल्य रद्द

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 1:11AMलासलगाव : वार्ताहर

कांद्यावरील किमान निर्यातमूल्य हे 700 वरून शून्य डॉलर केल्याची घोषणा शुक्रवारी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने केल्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात कृषीसाठी केंद्र सरकारने शेतकर्‍यांना सुखद धक्‍का देताच दुसर्‍याच दिवशी कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: घटविण्याचा निर्णय घोषित केला. कांद्याच्या भावात गेल्या आठवड्यापासून घसरण सुरू झाल्याने तीन हजार प्रतिक्विंटलवरून पंधराशे रुपये प्रतिक्विंटलवर आल्याने कांदा उत्पादक चिंताग्रस्त होते. कांदा भावातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नोव्हेंबर महिन्यापासून कमी झालेल्या कांदा निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची दाट शक्यता आहे. इतके दिवस शहरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार शेतीविषयक निर्णय घेऊन शेतमालाचे दर स्थिर राहावे, हा प्रयत्न करताना दिसत होते. मात्र, कांद्याचे निर्यातमूल्य शून्य करून शेतकरीवर्गाला सुखद धक्का देण्याचा प्रयत्न करून आगामी निवडणुका लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात कांद्यावरील निर्यातमूल्य 850 डॉलर प्रतिटन केले. या लादलेल्या अघोषित निर्यातबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांत निर्यातीला चांगलाच फटका बसलेला होता. आज घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरीवर्गाला दिलासा मिळणार आहे.