Mon, May 20, 2019 10:49होमपेज › Nashik › निर्यातमूल्य रद्द होताच कांद्याची उसळी

निर्यातमूल्य रद्द होताच कांद्याची उसळी

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:37AMमनमाड/लासलगाव : वार्ताहर

केंद्र सरकारने निर्यातमूल्य हटविल्यानंतर कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा होताच कांद्याने उसळी घेतली. सोमवारी मनमाड बाजार समितीत सरासरी भावात क्‍विंटलमागे तब्बल 809 रुपयांची वाढ झाली. तर, लासलगाव बाजार समिती 901 रुपयांनी कांदा वधारला. शुक्रवारी मनमाडला ज्या कांद्याला प्रतिक्‍विंटल 1311 रुपये भाव होता. आज त्याच कांद्याला 2120 रुपये भाव मिळाला. अवघ्या दोन दिवसांत कांद्याच्या भावात क्‍विंटलमागे वाढ झाल्याचे पाहून बळीराजा सुखावला आहे.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. केवळ कांद्याचेच नव्हे तर पेट्रोल, डिझेलपासून इतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. मात्र, त्याबाबत आवाज उठविण्याऐवजी कांद्याचे भाव वाढताच गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनीच या दरवाढीबाबत ओरड सुरू केली होती. 

कांद्याच्या वाढत्या किमतीवर आळा बसविण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालता येत नाही म्हणून निर्यातमूल्य शून्यावरून थेट 850 डॉलर केले. निर्यातमूल्यात इतकी मोठी वाढ करण्यात आल्याने व्यापार्‍यांना कांदा निर्यात करणे अशक्य झाले. एकीकडे बाजारात नवीन कांदा येण्यास सुरुवात होऊन आवक वाढलेली असताना दुसरीकडे कांदा निर्यात होत नसल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू झाली. ज्या कांद्याला 3500 तर 4000 हजार रुपये प्रतिक्‍विंटल भाव मिळत होता. तोच कांदा 1300 ते 1500 रुपये दराने विकण्याची वेळ आल्याचे पाहून शेतकर्‍यांमध्ये चिंता वजा केंद्र सरकारविरुद्ध असंतोष वाढला होता.

शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहून केंद्र सरकारने निर्यातमूल्य 850 डॉलरवरून 700 डॉलरवर आणले. निर्यातमूल्य 150 डॉलरने कमी झाल्यानंतरही कांद्याच्या भावात सुधारणा झाली नाही. त्यामुळे अखेर शुक्रवारी केंद्र सरकारने निर्यातमूल्य पुन्हा शून्य करण्यात आल्याची घोषणा केली. निर्यातमूल्य हटविताच  पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढ झाली. 13 हजार 400 क्‍विंटल कांद्याची आवक झाली असून, बाजारभाव किमान 1500, कमाल 2537 रुपये, तर सरासरी 2151 रुपये क्‍विंटलला मिळाले.