Mon, May 20, 2019 21:08होमपेज › Nashik › जमीन हस्तांतरणाची फाइल धूळ खात

जमीन हस्तांतरणाची फाइल धूळ खात

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 12:29AMनाशिक : प्रतिनिधी

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हा अनुभव सर्वसामान्यांसाठी नवीन नाही. परंतु,  दोन अधिकार्‍यांमधील समन्वयाच्या अभावामुळे शासकीय कामकाजाला फटका बसत आहे. तब्बल वर्षभरापासून निवडणूक शाखा गोदाम जमीन हस्तांतरणाची फाइल धूळखात पडून आहे. त्यामुळे दिव्याखालीच अंधार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक शाखेच्या स्व-मालकीचे गोदाम स्थापण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सरकार निधीही देणार आहे. या योजने अंतर्गत नाशिकमध्येही गोदाम उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी गत एप्रिल महिन्यात सय्यद प्रिंपी येथील शासनाची पाच एकर जागा निवडणूक शाखेला देण्यास मान्यता दिली. परंतु, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे आणि नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे जमीन हस्तांतरण करार रखडला आहे. त्यामुळे एकीकडे पारदर्शक कारभाराचा ढांढोरा पिटणार्‍या जिल्हा प्रशासनाच्या दोन विभागांमधील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.सय्यद पिंप्रीच्या जागेवर पाच एकरात तीन विभागांमध्ये गोदाम उभारण्यात येणार आहे.

यामध्ये कंट्रोल व बॅलेट युनिट ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष असतील तर व्हीव्हीपॅटसाठी तिसरा कक्ष असणार आहे. या तीन विभागांसह मशिन्स्च्या तपासणी व सील करण्यासाठी वेगळे कक्ष येथे स्थापण्यात येणार आहे. दरम्यान, याशिवाय गोदामामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किंग अशा विविध सोयीसुविधा केल्या जाणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोदामांचा आराखडा तयार करून तो शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला आहे. येत्या दोन दिवसात मान्यतेसह  अहवाल निवडणूक शाखेला प्राप्त होईल. जिल्हाधिकार्‍यांच्या अंतिम स्वाक्षरीनंतर निधीसाठी तो केंद्र सरकारला सादर केला जाईल. येत्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होत असताना दोन महिला अधिकार्‍यांमधील असमन्वयामुळे गोदाम जमीन हस्तांतरणाचा करार तब्बल वर्षभरापासून रखडून पडला आहे.

Tags : nashik, nashik news, Land transfer files,