Tue, Mar 19, 2019 16:15होमपेज › Nashik › भूसंपादनापोटी जागामालकास दोन कोटी देण्याचे आदेश

भूसंपादनापोटी जागामालकास दोन कोटी देण्याचे आदेश

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:10PMनाशिक : प्रतिनिधी

मौजे देवळाली शिवारातील 45 मी. रुंद रस्त्यामुळे बाधित झालेल्या क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकतधारकास 12 जुलैपर्यंत देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मनपाला दिले आहेत. त्यानुसार यासंदर्भातील प्रस्ताव नगररचना विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. स्थायी समितीने प्रस्ताव 15 दिवसांत मंजूर न केल्यास त्यास समितीची मंजुरी असल्याचे गृहीत धरून प्रस्ताव निकाली काढला जाईल या आयुक्‍तांनी काढलेल्या परिपत्रकाची आठवणही नगररचना विभागाने स्थायीला करून दिली आहे. 

मौजे देवळाली येथील स. नं. 187, 188 (पै) व 193 (पै) मधील 45 मी. (उड्डाणपूल व समांतर सर्व्हिस रोड) रुंद रस्त्यामुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे भूसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भूसंपादनाबाबतचा मोबदला मिळकतधारक यांना मिळत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात मनपाविरोधात याचिका दाखल केली होती. दाव्यातील सुनावणीत न्यायालयाने भूसंपादनाद्वारे एक वर्षाच्या आत निवाडा जाहीर करून मोबदला देण्याबाबत 26 जून 2014 रोजी निर्देश दिले होते. परंतु, त्यानंतरही कार्यवाही न झाल्याने जमीन मालकाने उच्च न्यायालयात 2015 मध्ये अवमान याचिका दाखल केली. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने भूसंपादन प्रस्तावामध्ये 50 टक्के रक्‍कम चार आठवड्यांच्या आत जमा करावी, असे आदेश दिले असून, ही रक्‍कम 12 जुलैपर्यंत जमा न केल्यास न्यायालयाचा अवमान होऊन मनपास शास्ती होऊ शकते, असे नगररचना विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. 50 टक्के रकमेनुसार मनपाला दोन कोटी चार लाख 70 हजार 644 रुपये उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्यालयाकडे जमा करावयाचे आहेत.