Sun, Apr 21, 2019 14:14होमपेज › Nashik › गांजा प्रकरणातील ‘लक्ष्मी’ गजाआड

गांजा प्रकरणातील ‘लक्ष्मी’ गजाआड

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 11:35PMपंचवटी : गांजा विक्री प्रकरणात फरार असलेली मुख्य संशयित शिवसेनेची माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मध्य प्रदेशमधील सेंधवा येथून अटक केली आहे. या अटकेमुळे शहरासह जिल्ह्यातील इतर गांजा पुरवठादारांसह, खरेदीदार आणि ग्राहकांची माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जून महिन्यात तपोवन परिसरात ओडिसा राज्यातून आणलेला  सुमारे 680 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीस दोन संशयितांना अटक केली. त्यानंतर सिन्नर, जळगाव जिल्ह्यातून काही संशयितांना गांजासह अटक केली. आठ दिवसांत पोलिसांनी सुमारे एक टनहून अधिक गांजा जप्‍त केला होता. पोलीस तपासात गांजाचा साठा पंचवटीतील लक्ष्मी ताठेच्या मागणीवरून आल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावरून ताठेचा सहभाग उघडकीस आणला. मात्र, पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच ती फरार झाली होती.

चौकशीतून बिंग फुटणार

लक्ष्मी ताठे हिच्याकडील चौकशीतून शहरासह जिल्हा व इतर जिल्ह्यांमधील गांजा विक्रेत्यांची नावे उघडकीस होण्याची शक्यता आहे. तसेच गांजा विक्रीमध्ये इतर राजकीय पदाधिकार्‍यांचा समावेश होता का याचाही तपास पोलीस करणार असल्याची शक्यता आहे. पंचवटीतील एका महंतांचेही नाव गांजा विक्रीत आघाडीवर असल्याने चौकशीतून या महंतांचेदेखील बिंग फुटते का चर्चेचा विषय बनला आहे.