Sun, Jun 16, 2019 12:49
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › नाट्य, काव्य, मुलाखतींची पर्वणी

नाट्य, काव्य, मुलाखतींची पर्वणी

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:48PMनाशिक : प्रतिनिधी

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ते स्मृतिदिन या कालावधीत कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून साजर्‍या होणार्‍या ‘कुसुमाग्रज स्मरण’ उपक्रमात यंदा नाट्य, काव्य, गायन, मान्यवरांच्या मुलाखती आदी नानाविध कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना लाभणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानने या कार्यक्रमांचा तपशील शनिवारी (दि. 24) जाहीर केला. येत्या दि. 27 फेब्रुवारी ते दि. 10 मार्च दरम्यान हा महोत्सव साजरा होणार आहे. सर्व कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी 6 वाजता होणार असून, या जागराचा समारोप दि. 10 मार्च रोजी ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार वितरणाने कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात होईल. दि. 27 रोजी ‘सुवर्ण किरणावली’ हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा आविष्कार असलेला कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

कार्यक्रमाची संकल्पना किशोर पाठक यांची, तर संगीत प्रा. मकरंद हिंगणे यांचे आहे. दि. 28 रोजी कोलकाता येथील गायक सम्राट पंडित यांचे गायन होणार असून, त्यांना सुभाष दसककर (संवादिनी), नितीन वारे (तबला) हे संगीतसाथ करणार आहेत. दि. 1 मार्च रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठान अभ्यासवृत्ती प्राप्‍त हृषिकेश पाळंदे यांच्याशी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन कडेपूरकर संवाद साधणार आहेत. दि. 2 रोजी कविसंमेलन रंगणार असून, त्यांत किशोर पाठक, प्रकाश होळकर, तुकाराम धांडे, लक्ष्मण महाडिक, खलील मोमीन, रेखा भांडारे, गंगाधर अहिरे यांचा सहभाग असणार आहे. याच दिवशी ‘बाल की खाल’ या डॉ. फय्याज अहमद फैजी लिखित पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. 

दि. 3 मार्च रोजी मुंबई विद्यापीठ प्रस्तूत ‘टूरटूर’ हे नाटक सादर होणार आहे. दि. 4 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 9 या वेळेत शहरातील कलावंत अखंड ख्याल संकीर्तन करणार आहेत. दि. 5 मार्च रोजी ‘गझल के साज उठाओ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात मीना परुळकर-निकम, श्रेयसी रॉय, ज्ञानेश्‍वर कासार हे गायन करणार असून, डॉ. फैयाज अहमद फैजी हे निवेदन करणार आहेत. दि. 6 मार्च रोजी डॉ. विनय ठकार हे ‘मादागास्कर : वंडर ऑफ नेचर’ हा कार्यक्रम स्लाइड शोच्या माध्यमातून सादर करणार आहेत. दि. 7 मार्च रोजी गायक मुकुंद फणसाळकर व रागिणी कामतीकर यांचा ‘नॉस्तॅल्जिया’ हा कार्यक्रम रंगणार आहे. दि. 8 मार्च रोजी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. दि. 9 रोजी मात्र कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही, तर दि. 10 रोजी ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.