नाशिक : प्रतिनिधी
सध्या गवगवा सुरू असलेले ‘मेक इन इंडिया’ अभियान मनमोहनसिंग यांच्या काळातच सुरू झाले होते. सध्याच्या सरकारने आधी ओएनजीसी, इस्रो, आयआयटीसारख्या ‘मेड इन इंडिया’ संस्थांची दखल घ्यावी आणि मग 70 वर्षांत काय झाले, असा प्रश्न विचारावा, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार तथा राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी केली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे केतकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक येथे सोमवारी (दि. 30) झाला. माजी कार्यवाह लोकेश शेवडे यांनी केतकर यांची मुलाखत घेतली. केतकर यांनी निरनिराळ्या विषयांवर परखड मते मांडली. ते म्हणाले, मॅट्रिकनंतर पवई आयआयटीच्या समृद्ध ग्रंथालयातील पुस्तकांच्या वाचनामुळे समाजवादी, कम्युनिस्ट, काँग्रेस व आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव पडला. पुढे पत्रकारितेत आल्यावर अभ्यासाअंती काही भूमिका बदलल्या. पत्रकाराला भूमिका असायला हवी.
मात्र, ती लवचिक, उदारमतवादी असावी. त्याने विरोधी मतांनाही आपल्या पत्रात स्थान द्यायला हवे. पत्रकार हा राजकारणीच असतो. त्यामुळे त्याने राजकारणात जाण्यात काही गैर नाही. टिळक, गांधी, नेहरू, आंबेडकर हे राष्ट्रीय नेते पत्रकारच होते. नेहरू यांची मिश्र अर्थव्यवस्था नंतर अनेक प्रगत देशांनी स्वीकारली. 1970 पूर्वी भारताची प्रतिमा ‘कटोरी हाती घेतलेला देश’ अशी होती. नंतर भारत स्वयंपूर्णच झाला नाही, तर अन्नधान्य निर्यात करू लागला. ओएनजीसी, भाक्रा नांगल, इस्रोसारखे प्रकल्प आकाशातून पडले नाहीत की, नागपूरच्या संघ कार्यालयात स्थापन झाले नाहीत. ही देशाची 70 वर्षांची पुण्याई आहे. भाजपाने 70 वर्षांत काय केले, असे विचारण्याआधी या पुण्याईचा विचार करावा, असेही केतकर म्हणाले.