Tue, Jul 23, 2019 16:43होमपेज › Nashik › किशोर दराडे शिवसेना पुरस्कृत उमेदवार

किशोर दराडे शिवसेना पुरस्कृत उमेदवार

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:26PMनाशिक : प्रतिनिधी 

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा  कालावधी शिल्लक असताना शिवसेनेनेदेखील रणांगणात उडी घेतली आहे. टीडीएफ संघटनेचे अधिकृत उमेदवार किशोर दराडे यांना शिवसेनेने पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि.4) मातोश्री येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घोषित केला. त्यामुळे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.

भाजपाने माजी मंत्री नवल पाटील यांचे चिरंजीव अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक लढवावी की नाही याबाबत सेनेत एकमत होत नव्हते. मात्र, अखेर टीडीएफ संघटनेचे अधिकृत उमेदवार किशोर दराडे यांना पक्षाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून सेनेने घोषित केले आहे. विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांचे किशोर दराडे हे बंधू आहेत. दराडे गेल्या 25 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षणसंस्थेचे व शिक्षणविषयक प्रश्‍न, शिक्षकांच्या मागण्या या संदर्भात दराडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यामुळे त्यांना पुरस्कृत उमेदवार करत नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे शिक्षक मतदारसंघाच्याही निवडणुकीत शिवसेना विजयी होईल, असा विश्‍वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी शिवसेनानेते मिलिंद नार्वेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख संभाजीराव पाटील, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, धुळ्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, उपनेते बबनराव घोलप, आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे, विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे आदी यावेळी उपस्थित होते.