Fri, Sep 21, 2018 03:37होमपेज › Nashik › नाशिक हत्याकांड : हत्या करणारा माथेफिरू जमावाच्या हल्ल्यात ठार

हत्या करणारा माथेफिरू जमावाच्या हल्ल्यात ठार

Published On: Apr 07 2018 4:11PM | Last Updated: Apr 07 2018 4:11PMबोरगाव (ता. सुरगाणा) : वार्ताहर

बोरगाव येथून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वांजूळपाडा येथे तिहेरी हत्याकांड घडले. माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. तर, घटनेनंतर जमावाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या माथेफिरूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, वांजूळपाडा येथील युवक गुलाब पालवी (25) शेतातून काम झाल्यावर घरी परतत असताना गावातील भास्कर जोपळे (40) या माथेफिरू तरुणाने फावड्याच्या सहायाने डोक्यात वार केले. या हल्ल्यात गुलाब पालवीनामक तरुणाचे डोके धडापासून वेगळे झाले. याचवेळी पालवीसोबत त्यांची मुलगी चांदनी (3) हिच्यावरही माथेफिरूने हल्ला केला. मात्र, गावातील श्याम पवार या तरुणाच्या सतर्कतेमुळे ती मुलगी बचावली. हल्ल्यात मुलगी किरकोळ जखमी झाली. हा प्रकार बघून गावातील काही तरुणांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना बघून माथेफिरूने पळ काढला आणि गावच्या नदीकाठी शेतात गहू पिकाच्या सोंगणीचे काम करीत असलेल्या राहीबाई बागूल (45) यांच्यावर धारदार दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात  राहीबाई यांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडला.

संतप्त जमावाने माथेफिरूवर लाठीमार करून जखमी केले. जखमी माथेफिरूला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, परिस्थितीचे गांंभीर्य पाहता वांजूळपाडा गावात शीघ्रकृती दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.