होमपेज › Nashik › जिल्ह्यात यंदा खरीप उत्पन्न घटणार

जिल्ह्यात यंदा खरीप उत्पन्न घटणार

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 04 2018 11:35PMनाशिक : सोमनाथ ताकवाले

जिल्ह्यातील पूर्वभाग असलेल्या येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांत खरीप हंगामात पेरणी झालेली पिके तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लांबलेल्या पावसामुळे मान टाकू लागली आहेत. आता पाऊस जरी झाला तरी शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळणार नसल्याने पूर्वभागात खरीप हंगामाचे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी हंगामावर केलेला खर्च भरून निघणार नसल्याची  शक्यता आहे.

पूर्वभागात पावसाचे प्रमाण कमी असते, हा अनुभव शेतकर्‍यांच्या गाठी असल्याने येथे कमी पाण्यावर येणारी खरीप पिके पावसाळ्यात घेतली जातात. त्यामुळे मालेगाव, येवला, नांदगाव या तालुक्यांतील क्षेत्रात कपाशीसह, बाजरी, मका या पिकांची पेरणी, लागवड अधिक केली जाते. तसेच बागलाण, देवळा आणि चांदवड तालुक्यात सोयाबीन, मका, तूर आदी पिकांना प्राधान्य दिले जाते. यंदा या भागात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे मशागत करून तयार असलेल्या शिवारात शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पेरण्या, लागवड पूर्ण करून घेतली होती. पेरण्यानंतरही पावसाची एक, दोनदा हजेरी लाभली होती. त्यामुळे अंकुरलेली पिके तरारून गेली होती.

वापसा मिळाल्याने पिकात खुरपणी केल्यानंतर मात्र पावसाने काही भाग वगळता हुलकावणी दिलेली आहे, ती आजपर्यंत कायम आहे. तीन आठवडे जरी पिकांना पाऊस नसला तरी, उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता कमी असते. मात्र, पूर्वभागात दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून पाऊस नसल्याने त्यामुळे पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे करपलेल्या शेतात शेतकरी नांगर चालून पीक नष्ट करीत आहेत. तर जी पिके तग धरून आहेत, त्यांची पाण्याची गरज भागली तरी शेतकर्‍यांना मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार आहे, त्यामुळे शेतकर्‍यांचे पाऊस नसला तरी नुकसान आणि आला तरी उत्पन्नात घट होऊन झळ बसण्याचे निश्‍चित आहे.