Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Nashik › केरळच्या महापुराचा मसाल्यांना फटका

केरळच्या महापुराचा मसाल्यांना फटका

Published On: Aug 28 2018 1:34AM | Last Updated: Aug 28 2018 12:18AMनाशिक : रवींद्र आखाडे

केरळमध्ये आलेल्या पुराचा परिणाम मसाला उत्पादनावर झाला असून, देशभरात मसाल्याच्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. प्रामुख्याने खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंना सर्वाधिक फटका बसला आहे. मसाल्याच्या अनेक पदार्थांचे भाव किलोमागे 30 रुपयांपासून तब्बल 300 रुपयांपर्यंत वाढले आहेत. जवळपास सहा महिन्यांपर्यंत तरी बाजारपेठेत या वस्तूंचे भाव वाढलेलेच असतील, अशी माहिती व्यापार्‍यांनी दिली.

मसाल्याच्या पदार्थांच्या उत्पादनामध्ये देशभरात केरळचा पहिला क्रमांक लागतो. मात्र, यंदा मुसळधार पावसामुळे केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे या राज्याचे जवळपास 27 हजार कोटींचे नुकसान झाले. या आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळ सरकार जिवाचे रान करताना दिसत आहे. मात्र, मसाल्याच्या पदार्थांची उत्पादनप्रक्रिया सुरळीत होण्यासाठी साधारणत: सहा महिन्यांहून अधिक काळ लागणार आहे. त्यामुळे मसाल्यात वापरण्यात येणारे खोबरे, वेलदोडे, लवंग, दालचिनी, मिरे, नागकेशर, कपूरचिनी, जायपत्री, रामपत्री आदी वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत. केरळच्या पुरामुळे बाजारपेठेत या वस्तूंची आवकच बंद झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आजघडीला उपलब्ध असलेल्या मालावरच व्यापार्‍यांची भिस्त आहे. मालाची आवक कमी होत चालल्यामुळे व्यापार्‍यांनी मसाल्याच्या वस्तूंचे भाव वाढवले आहेत. मसाल्यातील खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंसाठी केरळ हीच एकमेव बाजारपेठ आहे, तर अन्य वस्तूंना आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांचा पर्याय आहे. त्यामुळे याआधी 200 रुपये किलो असलेले खोबरे आता 230 ते 240 रुपये, 1200 रुपये किलो असलेले वेलदोडे आता 1500 ते 1600 रुपये किलो, 550 रुपये किलो असलेली लवंग आता 600 ते 700 रुपये किलो, 1500 रुपये किलो असलेली कपूरचिनी आता 2000 ते 2200 रुपये किलो झाली आहे. अचानक झालेल्या या भाववाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही बसला आहे. बाजारपेठेतील ही परिस्थिती अजून सहा महिने तरी अशीच कायम राहणार आहे.

नैसर्गिक आपत्तीचा फटका केरळवासीयांना बसला आहे. देशभरातून मदतीचा ओघ सुरू असला तरी केरळवासीयांनी आपले सर्वस्व गमावले आहे. अशा परिस्थितीत चार-दोन वस्तू मिळाल्या नाही म्हणून व्यापार्‍यांनी नाराज होण्याचे कारण नाही. मसाल्याच्या वस्तूंपैकी खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंना जास्त फटका बसला आहे. अन्य वस्तूंसाठी आंध्रसह दुसर्‍या बाजारपेठा आहेत. केरळ पुन्हा पूर्वपदावर यावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान अजून सहा महिने तरी केरळची बाजारपेठ सुरू होण्यासाठी लागतील.- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटना